निपाणी : कोगनोळीजवळ दोन लाखांचे अफीम जप्त; सावंतवाडीचा ढाबाचालक गजाआड | पुढारी

निपाणी : कोगनोळीजवळ दोन लाखांचे अफीम जप्त; सावंतवाडीचा ढाबाचालक गजाआड

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळ असणाऱ्या ढाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे 35 किलो अफीम (अंमली पदार्थ) गुरुवारी जप्त करण्यात आले. ही संयुक्त कारवाई करताना बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबा चालक गिरीधरसिंग किशोरसिंग राजपुरोहित (वय 41, रा. इन्सुली, सावंतवाडी) याला अटक केली. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून राजपुरोहित यांच्याकडून अफीमची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबतचे वृत्त केवळ दै. पुढारीने गुरुवारी (दि.24) रोजी प्रसिद्ध केले होते. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चिकोडी विभागाचे अबकारी पथक बुधवारी सायंकाळी महामार्गावर गस्त घालत असताना महामार्गाशेजारी कोगनोळी आरटीओ ऑफिस नाक्यासमोर दोन ट्रक चालकांमध्ये वाद चालला होता. दरम्यान यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ संशयावरून वाद चाललेल्या ठिकाणी बराच वेळ थांबून चाचपणी केली. यावेळी पथकाने केवळ संशयावरून जवळच असलेल्या राजस्थानी राजपुरोहित धाब्यावर वेशांतर करून टेहळणी ठेवली.

यावेळी महामार्गावरून ये-जा करणारे ट्रक चालक व अन्य वाहतुक व्यवसायिक अफीम हा नशीला पदार्थ खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने ढाबा चालत गिरीधरसिंग राजपुरोहित याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गिरीधरसिंग यांनी आपण धाब्यामध्ये अफिमची विक्री करीत असल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने गिरीधरसिंग यांच्याकडून दोन पोत्यामध्ये असलेले सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे 34 किलो 465 ग्रॅम अफिम जप्त केले.

याबाबत अबकारी चिकोडी विभागाचे उपायुक्त जगदीश कुलकर्णी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून धाबाचालक गिरीधरसिंग हा व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे 100 व 250 ग्रॅम प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये त्याच्याकडून 500 व 1 हजार रुपयाला ठराविक व नेहमीचे ग्राहक हेरूनच असल्या पदार्थाची विक्री करीत होता. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पकडण्यात आलेल्या 35 किलो अफीमची किंमत सुमारे 10 लाख रुपये होते.

दरम्यान यावेळी गिरीधरसिंग यांच्यावर अबकारी विभागाने अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करून त्याला चिकोडी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची न्यायालयाने बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. ही कारवाई अबकारी विभागाचे जिल्हा अप्पर आयुक्त डॉ. वाय.मंजुनाथ, सहाय्यक अबकारी आयुक्त फिरोजखान किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी अबकारी विभागाचे सहाय्यक उपायुक्त अनिलकुमार नंदेश्वर, उपाधीक्षक राजु गुंडे यांच्यासह उपनिरीक्षक शिवकुमार अमिनभावी, शंकर चौगुला यांच्यासह हवालदार केदारी नलवडे, अर्जुन मल्लापुरे, दशरथ कुराडे सागर बोरगावे यांनी केली. या कारवाईमुळे जिल्हा अबकारी विभागाने चिकोडी अबकारी पथकाचे अभिनंदन केले आहे.

नाशिकपर्यंत धागेदोरे….

अबकारी पथकाने गुरुवारी जप्त करण्यात आलेल्या अफिमचा पुरवठा हा धाबाचालक गिरीधरसिंग याला नाशिक येथून होत होता. गेल्या अनेक वर्षापासून गिरीधरसिंग यांच्याकडून जोडधंदा म्हणून हा व्यवसाय चालला होता, अशी धकादायक बाब तपासात उघड झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कोणत्याच खात्याच्या नजरेस ही बाब दिसून न आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून अखेर अबकारी विभागाने या व्यवसायाचा भांडाफोड केल्याने साहजिकच यातील म्होरक्या (पुरवठादार) कोण हे आता लवकरच उघडकीला येणार आहे.

अधिक वाचा :

Back to top button