बेळगाव : रेशन धान्यात प्लास्टिक तांदूळ? | पुढारी

बेळगाव : रेशन धान्यात प्लास्टिक तांदूळ?

कारदगा; पुढारी वृत्तसेवा :  येथे रेशन दुकानांमधून शिधापत्रकाधारकांना देण्यात येणार्‍या तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त प्लास्टिक तांदळाचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सदर प्रकाराची अधिकार्‍यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एका ग्राहकाने कारदगा सोसायटीमधून महिन्याचे 40 किलो रेशनचे तांदूळ घरी नेले. काही तांदूळ भात करण्यासाठी काढले. ते निवडत असतानात्यामध्ये मोठ्या जाडीचे तांदूळ आढळले. अशा प्रकारचे तांदूळ जमा केले. त्यांचे वजन दोन किलो भरले. प्लास्टिकसदृश तांदूळ पाण्यामध्ये टाकले असता ते तरंगू लागले. त्यामुळे भेसळ होत असल्याचे निदर्शनास आल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रेशन दुकानदार व नागरिकांना याबाबत माहिती दिल्यावर दुकानदाराने तहसीलदार व अन्न नागरी पुरवठा खात्याला याची कल्पना दिली. रेशन धान्यामध्ये प्लास्टिकसदृश तांदूळ भेसळ केले जात असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुका प्रशासन व अन्न नागरी पुरवठा खात्याने त्याची दखल घेऊन बनावट तांदळाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Back to top button