विजापूर : भाविकांच्या टेम्पो ट्रॅक्सला अपघात, दोघेजण जागीच ठार | पुढारी

विजापूर : भाविकांच्या टेम्पो ट्रॅक्सला अपघात, दोघेजण जागीच ठार

विजापूर : पुढारी वृत्तसेवा – अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना अथणी येथील भाविकांचा अपघात झाला. टेम्पो ट्रॅक्सने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात दोघे जागीच ठार झाले तर अन्य नऊ जण जखमी झाले. जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात गुरुवारी पहाटे राष्ट्रीय महामार्ग ५० वरील इंडी जिल्हा विजापूर येथील धुळखेड गावाजवळ झाला. या घटनेची नोंद झळकी जिल्हा विजापूर पोलीस स्थानकात करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पुढील तपास सुरू ठेवला आहे. अपघातात ठार झालेले दोघेही भाविक अथणी शहरातील रहिवासी आहेत. भैयाजी शिंदे (वय ५०) आणि सुमित्रा शिंदे (वय ४५) असे दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अत्रे शहरातील रहिवासी असलेले भाविक गुरुवारी पहाटे अक्कलकोट येथील स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी जात होते. टेम्पो ट्रॅक्स क्रमांक केए २३ ए ५४८१ यामध्ये सर्वजण होते. इंडी तालुक्यातील धुळखेड गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला या गाडीने गुरुवारी पहाटे पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत अथणी शहरातील भैय्याजी शिंदे (वय ५०) आणि सुमित्रा शिंदे (वय ४५) या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Back to top button