बेळगाव : एकाच गटातील वर्चस्ववादातून खून; सुळेभावी दुहेरी खून प्रकरण | पुढारी

बेळगाव : एकाच गटातील वर्चस्ववादातून खून; सुळेभावी दुहेरी खून प्रकरण

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  सुळेभावी (ता. बेळगाव) येथे गुरुवार दि. 6 रोजी झालेल्या दुहेरी खूनप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी खून केल्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली आहे. महेश मुरारी (वय 26) व प्रकाश हुंकरी-पाटील (वय 24) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी शशिकांत ऊर्फ ससा ऊर्फ जुट्टु भीमशी मिसाळे (वय 24), यल्लेश सिद्राई हुंकरी-पाटील (वय 22), मंजुनाथ शिवाजी परोजी, देवाप्पा रवी कुकडोळी (वय 26, सर्व रा. सुळेभावी) संतोष यल्लाप्पा हणबरट्टी (वय 20), भरमाप्पा नागाप्पा नायक (वय 20 दोघे रा. खनगाव बी.के.) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची चौकशी करण्यात आली आहे. वैयक्तिक भांडणातून त्यांचा खून करण्यात आल्याचे संशयितांकडून सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी काहीजण गवंडी काम करतात तर काहीजण बेरोजगार आहेत. खून करण्यात आलेले व अटक झालेले सर्वजण अनेक वर्षांपासून एकत्रच होते. गट तयार करून गावात दादागिरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमधील महेश मुरारी हा अनेक वर्षांपासून गोकाक येथे वास्तव्यास होता. तो तेथील टायगर गँगच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. वर्चस्वातून त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. त्यातूनच हे खून झाल्याचे  सांगण्यात येत आहे.

गावात बंदोबस्त कायम

खुनाची घटना घडल्यानंतर मारिहाळ पोलिसांकडून सुळेभावीत बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. मृतांवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात पोलिस बंदोबस्त कायम आहे.

दोन पोलिस कर्मचारी निलंबित

खून प्रकरणानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बिट पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हेडकॉन्स्टेबल बी. एन. बळगन्नावर, बीट कॉन्स्टेबल आर. एस. तळेवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आपल्या बीटमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असतानाही त्यावर नियंत्रण ठेवण्याकडे या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सदर कारवाई केली आहे.

Back to top button