बेळगाव : मनपा आयुक्त विसरले टार्गेट; महसूल निरीक्षकांना पुन्हा आधार लिंकचे काम | पुढारी %

बेळगाव : मनपा आयुक्त विसरले टार्गेट; महसूल निरीक्षकांना पुन्हा आधार लिंकचे काम

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  यंदा बेळगाव शहरातून मालमत्ता कर वसुली 100 कोटी रुपयांचे टार्गेट देऊन पंधरा दिवस होण्याआधीच महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी घूमजाव केला आहे. कर्मचार्‍यांना वसुलीशिवाय दुसरे काम देणार नाही, असे सांगणार्‍या आयुक्तांनी मतदार ओळखपत्रांना आधार लिंकचे दिले असून, ते काम वेगाने झाले नाही तर निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे शंभर कोटी टार्गेट कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उद्भवला आहे.

महापालिका सभागृहात शनिवारी (दि. 1) संध्याकाळी आयुक्त डॉ. घाळी यांनी महसूल विभागाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आधार लिंकबाबत सूचना केल्या. ते म्हणाले, दीड महिन्यात केवळ 42 टक्केच मतदार ओळखपत्रांना आधार क्रमांक लिंक करण्याचे काम झाले आहे. हे काम वेगाने होणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या निरीक्षकांनी निर्धारित टार्गेटपेक्षा 25 टक्क्यांहून कमी काम केले आहे, त्यांना निलंबित करण्यात येणार असून 50 टक्क्यांपर्यंत काम केलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी सर्व निरीक्षकांनी वेगाने काम करावे. पंधरा दिवसांपूर्वी आयुक्तांनी महसूल विभागाची बैठक घेत यंदा शंभर कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा करण्यासाठी टार्गेट दिले होते. हा कर जमा करण्यासाठी महसूल विभागातील कर्मचार्‍यांना कोणतीही इतर कामे लावण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले होते.

निरीक्षकांनी इतर कामे लागत असल्यामुळे महसूल वसुलीवर परिणाम होत असल्याचे सांगितले होते. पण, इतर कामांतून महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना मुभा देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. घाळी यांनी केल्या होत्या. त्यानुसार महसूल उपायुक्त प्रकाश हणगंडी यांनीही कर्मचार्‍यांना सूचना केल्या होत्या. पण, आज अचानक पुन्हा आयुक्तांनी मतदार ओळखपत्रांना आधार क्रमांक लिंक करण्याबाबत आदेश बजावले आहेत.

वसुली मोहीम लांबणीवर

शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी महसूल खात्याच्या कर्मचार्‍यांनी दोन दिवस लागून थकबाकीदारांची यादी तयार केली होती. आजपासून वसुलीला सुरुवात करण्यात येणार होती. पण, महापालिका आयुक्तांनी पुन्हा आधार लिंकचे काम लावले असून सोमवारपर्यंत 20 हजाराचे टार्गेट दिल्यामुळे वसुलीची मोहीम लांबणीवर पडणार आहे.

Back to top button