बेळगाव : सराफांना लुटणारी टोळी जेरबंद; 10 जणांना अटक | पुढारी

बेळगाव : सराफांना लुटणारी टोळी जेरबंद; 10 जणांना अटक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  दोघा सराफ भावांना लुटून त्यांच्याकडील सोने व रोकड असा 28 लाखांचा ऐवज लुटणार्‍या दहा जणांच्या टोळीला गोकाक पोलिसांनी जेरबंद केले. त्यांनी बेळगावहून जाऊन ही लूट केली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजासह चार दुचाकी व अन्य साहित्य असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये सिद्धार्थ ऊर्फ सिद्धू चांगदेव कडोलकर (वय 21), प्रदीप बसवराज जोशी (21), मारुती राजू साळुंखे (23), सौरभ लक्ष्मण मालाई (19, चौघेही रा. कणबर्गी, ता. बेळगाव), निवृत्ती आप्पाराव मुतगेकर (मारुती गल्ली, सोनोली, ता. बेळगाव), अनिल रामचंद्र पत्तार (मेळवंकी, ता. गोकाक), पंकज खांडेकर (शिनोळी, ता. चंदगड), विजय नागोबा कदम (कुद्रेमानी, ता. बेळगाव), सागर पाटील (कुद्रेमानी, ता. बेळगाव) व मनोहर सोनार (रा. तुर्केवाडी, ता. चंदगड) यांचा समावेश आहे.

फिर्यादी संजीव नामदेव पोतदार व त्यांचा भाऊ रवींद्र सदानंद पोतदार (दोघेही, रा. शिंदीकुरबेट, ता. गोकाक) यांचे गोकाक येथे सराफी दुकान आहे. 17 सप्टेंबर रोजी रात्री ते काम आटोपून गावी निघालेले असताना चार दुचाकींवरून आलेल्या आठ जणांनी त्या दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांच्याकडील अर्धा किलोचे सोन्याचे दागिने व 2 लाख 80 हजारांची रोकड असा सुमारे 28 लाखांचा ऐवज लुटला होता.

गोकाकचे उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घटप्रभा ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल ब्याकूड व त्यांच्या सहकार्‍यांनी याचा तपास करून पोलिसांनी दहा जणांना जेरबंद केले आहे.

Back to top button