बेळगाव : शंभर कोटींच्या टार्गेटवर आक्षेप | पुढारी

बेळगाव : शंभर कोटींच्या टार्गेटवर आक्षेप

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांच्या आदेशानुसार यंदा शंभर कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्याची सूचना महसूल उपायुक्तांनी केली. पण, त्यावर आक्षेप घेत आम्हाला इतर कामे लावण्यात येऊ नयेत, पीआयडी लॉग इन आमच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली. महापालिकेत महसूल निरीक्षक प्रकाश हणगुंडी यांच्या कक्षात मंगळवारी (दि. 27) महसूल निरीक्षक, अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांच्या सूचनेनुसार शंभर कोटी रुपयांच्या महसूल उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली.

हणगुंडी म्हणाले, आयुक्त डॉ. रूद्रश घाळी यांनी यंदा शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. ही वसुली शक्य आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करावे. त्यावर निरीक्षकांनी आक्षेप घेतला. महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना महसूल वसुलीबरोबरच इतर कामेही लावण्यात येतात. त्यामुळे वसुलीवर परिणाम होत असतो. पीआयडी लॉग इन केवळ तीन अधिकार्‍यांकडे आहे. त्यामुळे पीआयडीसाठी आमचा पूर्ण दिवस जात आहे. त्यामुळे पीआयडी लॉग इन आमच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली. हणगुंडी यांनी, महसूल कर्मचार्‍यांना इतर कामे लावण्यात येणार नाहीत. याबाबत आयुक्त डॉ. घाळी यांच्याशी चर्चा झाली आहे. पण, पीआयडी लॉग इनबाबत आयुक्तांशी चर्चा करावी लागेल, असे सांगितले. यावेळी महापालिकेचे अधिकारी संतोष आनिशेट्टर, आर. बी. चव्हाण, एफ. बी. पीरजादे, फारूक यड्रावी यांच्यासह निरीक्षक यल्लेश बच्चलपुरी, मलिक गुंडप्पणावर, अनिल बिर्जे आदी उपस्थित होते. 100 कोटी वसुलीचे उद्दिष्टअर्थसंकल्पातील तरतुदीनुसार महापालिकेकडे प्रत्यक्ष महसूल वसुली उद्दिष्ट 50 कोटी आहे. त्यानुसार सध्या 40 कोटींपर्यंत वसुली करण्यात आली आहे; पण आता आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी शंभर कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिल्यामुळे कर्मचार्‍यांना कसरत करावी लागणार आहे.

Back to top button