बेळगावात ‘पीएफआय’वर छापे; ७ जणांना अटक | पुढारी

बेळगावात ‘पीएफआय’वर छापे; ७ जणांना अटक

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या बेळगावातील सात पदाधिकार्‍यांना मंगळवारी पहाटे प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत अटक करण्यात आली. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती. मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौघांना तर एपीएमसी ठाणे हद्दीतून तिघांना अटक झाली. राज्यभरातही राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए-नॅशनल इन्वेस्टिगेटिव्ह एजन्सी) छापे टाकून 80 जणांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या आठवड्यात देशभरात एनआयने पीएफआय नेत्यांवर छापे टाकले होते. त्याचा निषेध म्हणून संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काकती येथेही महामार्ग रोखून धरण्यात आला होता. भविष्यात असा प्रकार घडू नये, याची काळजी घेत मंगळवारी देशभर तसेच कर्नाटकातही पीएफआयच्या पदाधिकार्‍यांची धरपकड मोहीम राबवली.

राज्य पोलिस खात्याकडून मिळालेल्या आदेशानुसार पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी बेळगावातही सोमवारी रात्रीपासून शोधमोहीम राबवत सात जणांना अटक केली. काकती येथे आंदोलन करणारे तसेच पुन्हा ज्यांच्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा सात जणांवर अटकेची कारवाई झाली. त्यांच्याकडून बाँड लिहून घेतले. यानंतर त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

अटक केलेले संशयित असे

झकीउल्ला फारूक फैजी (आझमनगर), सलाउद्दिन बाबूसाब किल्लेवाले (वय 44, शिवाजीनगर), अबीदखान गौसखान कडोली (आसदखान सोसायटी, शिवाजीनगर), बद्रुद्दीन हसनसाब पटेल (आसदखान सोसायटी, शिवाजीनगर), समीउल्ला अब्दुलमजीद पीरजादे (34, अमननगर), जहीर गोशामुद्दिन घीवाले (40, बॉक्साईट रोड) व रेहान अब्दुलअजीज शायन्नवर (25, विद्यागिरी, बेळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

कर्नाटकात छापे

बंगळूर : बेकायदेशीरपणे रक्कम गोळा करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पीएफआय व एसडीपीआय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासांवर मंगळवारी राज्यभर छापे घालण्यात आले. एनआयए तसेच राज्य पोलिसांनी संयुक्तपणे चार दिवसांपासून ही कारवाई हाती घेतली आहे. बेळगावसह मंगळूर, बंगळूर, विजापूर, शिमोगा, रामनगर, कोलार, उडुपी, रायचूर, चामराजनगर आदी जिल्ह्यांमध्ये छापे घालून दिवसभरात 80 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वैयक्तिक चौकशी करण्यात आली. यापैकी काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. बंगळूर शहर पोलिसांनी 15 जणांना अटक केली. पीएफआयचे जाळे बिदर, रायचूर, चामराजनगर, म्हैसूर, बंगळूर कोलार आदी जिल्ह्यांत पसरल्याचे दिसून आले. हुबळी आणि कलघटगीत 10, बेळगावात 7, मंगळुरात 14, विजापूर, होसकोटे येथे 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Back to top button