बेळगाव : चुकीच्या वेळापत्रकामुळे पॅसेेंजर धावताहेत मोकळ्या; रेल्वेला आर्थिक फटका | पुढारी

बेळगाव : चुकीच्या वेळापत्रकामुळे पॅसेेंजर धावताहेत मोकळ्या; रेल्वेला आर्थिक फटका

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  बेळगाव-मिरज मार्गावर धावणार्‍या पॅसेंजर गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने या गाड्या मोकळ्याच धावत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाला आर्थिक फटका तर बसतच आहे. शिवाय, प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. कॅसलरॉक-मिरज गाडीला तर अक्षरश: आठ ते दहाच प्रवासी असतात.

बेळगाव-मिरज मार्गावर 27 ऑगस्टपासून सहा पॅसेंजर गाड्यांची ये-जा सुरू आहे. कामगार, मजूर, भाजी विक्रेते, रुग्ण, नोकरदार, विद्यार्थ्यासाठी बेळगाव-मिरज रेल्वे सोयीस्कर आहे. जवळपास पाच हजार लोकांची पॅसेंजर गाड्यांतून ये-जा सुरू असते. दोन वर्षापूर्वी पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांसाठी सोयीस्कर होते. मात्र, आताचे वेळापत्रक गैरसोयीचे झाल्याने या गाड्या मोकळ्याच धावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दोन वषार्ंपूर्वी सकाळी 6 वा. बेळगावहून पॅसेंजर सोडण्यात येत होती. ही गाडी सकाळी 9 वा. मिरजला पोहचत होती. औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे कामगार, भाजी विक्रेत्यांना सोयीची होती. आता तशी एकही गाडी नाही. हीच गाडी साडेनऊला परतून साडेबारापर्यंत बेळगावला पोहचत होती. विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बेळगावला येण्यासाठी ही गाडी सोयीस्कर होती.

मिरज-कॅसलरॉक (क्र. 17333) गाडी मिरजहून सकाळी 11.50 सुटत असून, कॅसलरॉकला सायंकाळी 5.45 वा. पोहचत आहे. या गाडीला थोडेफार प्रवासी असतात. कॅसलरॉक-मिरज (क्र. 17334) कॅसलरॉकहून सायंकाळी 6.30 वा. सुटत असून मिरजला रात्री 12.30 पोहचत आहे. ही गाडी कधीच वेळेवर येत नाही. बेळगावला पोहोचण्याची वेळी रात्री 8.40 असताना तब्बल तास ते दीड तास उशिरा ही गाडी येते. या गाडीत सात ते दहाच प्रवासी असतात. घटप्रभा रेल्वे स्टेशनवर ही गाडी पूर्ण रिकामी होते. मिरजला पाच ते सहा प्रवासी उतरतात. रात्री 1 वाजेपर्यंत ही गाडी पोहचत
आहे.

मिरज-लोंढा (क्र. 0751) मिरजहून सायंकाळी 7 वा. सुटत असून ही गाडी लोंढ्याला रात्री 11.55 पोहचते. या गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
लोंढा-मिरज (क्र.07352) लोंढ्याहून सकाळी 6.40 वा. सुटत असून, मिरजला सकाळी 11.15 पोहचते. हुबळी- मिरज (क्र. 17332) गाडी हुबळीहून सकाळी 10.30वा. सुटत असून मिरजला सायंकाळी 6.30वा.पोहचत आहे. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिंळत आहे. मिरज-हुबळी (क्र. 17331) गाडी मिरजहून सकाळी 6.10सुटत असून, हुबळीला दुपारी 3 वा.पोहचते. या गाडीला कुडचीपासूनच प्रवाशांना प्रतिसाद मिळत आहे.

महिला प्रवाशांत भीती

कॅसलरॉक- मिरज गाडी बेळगावला रात्री 9 नंतरच येत आहे. ही गाडी पूर्णपणे मोकळी धावत असल्यामुळे महिला प्रवाशांना यामध्ये बसण्यास भीती वाटत आहे. मिरजहून लोंढ्याला जाणारी पॅसेंजर गाडीही रात्री जात असल्यामुळेे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे.

सध्या या पॅसेंजर गाड्यांचा सर्व्हे सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार यामध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांनीही यासंदर्भात हुबळी रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करावा. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद , तिकीट विक्री याची माहिती घेऊन बदल सरव्यवस्थापकांच्या सूचनेनुसार बदल करण्यात येईल.
– अनिस हेगडे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी
दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग.

Back to top button