बेळगाव : सळसळत्या उत्साहात मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन | पुढारी

बेळगाव : सळसळत्या उत्साहात मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडला मंगळवारी दुसर्‍या दिवशीही उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनीमधून प्रारंभ झालेल्या दौडची अनगोळ येथील महालक्ष्मी मंदिराजवळ सांगता करण्यात आली. दौडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम – जय श्रीराम, बोलो भारत माता की जय, अशा घोषणानी परिसर दणाणून गेला.

पहाटे सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन कार्यक्रम झाला. यादरम्यान बाबली गल्ली येथे तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या विवाह सोहळ्यावर आधारित सजीव देखावा सादर केला होता. हा सजीव देखावा हा दौडमधील सहभागी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

दौड मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. फुलांचाही वर्षाव करण्यात आला. संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. यानंतर एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ यामार्गे गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, हरी मंदिर, चिदंबर नगर, हादूगिरी, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली या मार्गाहून पुढे बाबली गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली यानंतर अनगोळ येथील महालक्ष्मी मंदिरात दौडची सांगता करण्यात आली.

गुरुवारचा मार्ग

सदाशिवनगर येथील बसवाण्णा मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. पहिला मुख्य क्रॉस, दुसरा क्रॉस, सदाशिवनगर, दुसरा मुख्य क्रॉस, चौथा क्रॉस, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकरनगर, गणेश चौक, मरगाई मंदिर, सदाशिवनगर चौथा क्रॉस, तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस, नेहरूनगर तिसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, गँगवाडी, दुर्गामाता रोड, रामनगर, अशोकनगर, सुभाषनगरमार्गे जोतिबा मंदिर, शिवबसवनगर येथे सांगता होणार आहे

Back to top button