बेळगाव : पाच मंदिर कमिटीतर्फे 15 फूट उंच रथाची मिरवणूक | पुढारी

बेळगाव : पाच मंदिर कमिटीतर्फे 15 फूट उंच रथाची मिरवणूक

बेळगाव;  संदीप तारिहाळकर :  बेळगावच्या सांस्कृतिक वैभवाला येथील विविध उत्सवांचा मोठा साज आहे. नवरात्रोत्सवात तर शहरातील कॅम्प विभागाने आपले वेगळेपण जोपासले आहे. कॅम्पमधील नवरात्रोत्सवाचे यंदा 122 वे वर्ष असून रथ मिरवणुकीला 71 वर्षांची परंपरा आहे. कॅम्प येथे तेलगु कॉलनी येथे मरीमाता व दुर्गादेवी मंदिर, बी. मद्रास स्ट्रीट येथील मुतू मरीअम्मा मंदिर, फीश मार्केट येथील कुंतीदेवी मंदिर, के. टी. पुजारी अँड सन्स यांचे मरीअम्मन मंदिर व आर. ए. लाईन जवळील तुलकानामादेवी मंदिर अशा पाच मंदिर कमिटीतर्फे होणारा नवरात्रोत्सव व 15 फुटाहून उंच रथांची मिरवणूक हे कॅम्प येथील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

गत दोन वर्षे नवरात्रोत्सव कोरोनामुळे साधेपणाने झाला. यंदा कोरोनामुक्त वातावरण असल्याने कॅम्प परिसरात मोठा उत्साह आहे. सर्वच मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. तेलगु कॉलनी येथे पंच मंडळाचे अध्यक्ष मारुती जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मरीमाता देवीसह अन्य मंदिरांची रंगरंगोटी पूर्ण झाली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 15 फूट उंच रथ निर्मितीचे कामही पूर्ण झाले आहे. तेलगू कॉलनीमध्ये दसरा कमिटी यंदा प्रथमच स्थापन झाली असून अनंत मेणगे (अध्यक्ष), साईनाथ छत्रे (उपाध्यक्ष), जयवंत बोगे (खजिनदार), प्रकाश मेणगे (सेक्रेटरी), श्रीनिवास दासर (उपसेक्रेटरी) यांच्यासह अन्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

1951 मध्ये प्रथम रथ मिरवणूक

के. टी. पुजारी अँड सन्स यांच्या मरीअम्मन देवी मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथम 1951 मध्ये रथ मिरवणूक सुरु झाली. 1901 ते 1950 दरम्यान पालखी मिरवणूक होत असे. 1951 पासून कॅम्पमध्ये मरीअम्मन देवी मंदिर कमिटीतर्फे मानाच्या रथाची मिरवणूक सुरु झाली. ब्रिटीश काळात कॅम्पमधील चर्च व प्रशासनाच्या वास्तू बांधण्यासाठी तामिळ समाज 1901 मध्ये बेळगावात आला आणि या ठिकाणी नवरात्रोत्सव सुरु झाला. यंदाच्या नवरात्रोत्सवाचे 122 वे वर्ष आहे. नरगुंदकर भावे चौक येथेही लक्ष्मी व्यंकटरमण मंदिराचा रथोत्सव होतो, मात्र कॅम्प येथील रथ मिरवणुकीला वेगळेच ऐतिहासिक महत्व आहे.

 

कॅम्प येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मरीमाता व दुर्गादेवी मंदिर सजावट काम पूर्ण झाले आहे. नउ दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. मिरवणुकीसाठी हलगी, ढोल-ताशांचा सराव सुरु असून उत्सवात सर्वजण भक्तिभावाने सहभागी होतात.
– श्रीनिवास पाटील, प्रवक्ता, मरीमाता व दुर्गामाता मंदिर तेलगु कॉलनी.

कॅम्प येथील नवरात्रोत्सवाचे यंदा 122 वे वर्ष आहे. गत दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साधेपणाने झाला. यंदा रथ निर्मिती तसेच मंदिर रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. रथ मिरवणुकीत डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्याद्वारे मिरवणूक काढण्याची परंपरा कायम आहे.
– दामोदर करपण्णास्वामी पुजारी, मरिअम्मन देवअप्रतिक्रीया

Back to top button