
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा बेकिनकेरे येथील गोजगा क्रॉस येथील हॉटेलमध्ये मंगळवारी चोरीची घटना घडली. यामध्ये 15 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्याचबरोबर दुचाकीतील 10 लि. हून अधिक पेट्रोलवरही डल्ला मारला. शेजारील ट्रॅक्टरमधील पाणेही पळवून नेले. यामुळे घबराट पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेकीनकेरे येथील गोजगा क्रॉस येथे रवींद्र रामचंद्र कागीनकर (रा. हडलगे, ता. गडहिंग्लज) यांचे हॉटेल आहे. त्या हॉटेलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथील 3 हजार रोख रक्कम, 2 हजार रुपयांची चॉकलेट तसेच 3 हजार रुपयांचा गुटखा, 2 हजार रुपयांची खाऊची पाकिटे, बर्फी आदी साहित्य लांबवले. चोरट्यांनी 50 किलो रवा जमिनीवर ओतून रिकाम्या पिशवीतून साहित्य भरून घेऊन रव्याचेही नुकसान केले आहे. यामुळे 15 हजार रुपयांच्या फटका सदर हॉटेल चालकाला बसला आहे.
हॉटेल समोरील मारुती पाटील, यल्लाप्पा भोगण, तुकाराम सातेरी यांच्या तीन दुचाकींचे पाईप कापून 10 लिटरहून अधिक पेट्रोल चोरट्यांनी लंपास केले. सोमनाथ सावंत यांच्या ट्रॅक्टर मधील पाणेही चोरट्यानी पळवले. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणापासून काही अंतरावर असणार्या परसू नाईक (रा. होसूर) यांच्या हॉटेलच्या पाठीमागून पत्रा उचलून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काही दिवसांपासून या परिसरात सातत्याने चोर्या होत आहेत
घटनास्थळापासून काही अंतरावर असणार्या सैराट हॉटेल समोरील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, यामध्ये रात्री 2.20 वा. 3 दुचाकी वरून 6 जण सैराट हॉटेल जवळ येऊन पुन्हा चोरी झालेल्या हॉटेल कडे जात असल्याचे दिसून येत आहे.