बेळगाव महापालिका निवडणूक : मतदान सुरु, वैभवनगरमध्ये तणाव | पुढारी

बेळगाव महापालिका निवडणूक : मतदान सुरु, वैभवनगरमध्ये तणाव

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव महापालिका निवडणूक साठी शुक्रवारी (दि. 3) सकाळी मतदानास सुरूवात झाली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी मतदान केंद्रावर रांग लावली आहे. आज सकाळी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत १५.१७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

बेळगाव महापालिकेसाठी ५८ प्रभागासाठी निवडणूक पार पडत आहे. बेळगाव महापालिकेसाठी आज सकाळी सात वाजता उत्साहाने मतदानास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता एकूण ५.३९ टक्के इतके मतदान झाले.

काही मतदान केंद्रामध्ये मतदारांची नावे नसल्यामुळे तात्काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक ४९, ५२ आणि क्रमांक ३९ या प्रभागाचा समावेश आहे.

याच दरम्यान वैभवनगर येथे दोन परस्पर विरोधी उमेदवारांच्या गटामध्ये तणाव झाला. यानंतर एपीएमसी पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेवून तणावाची परिस्थिती आटोक्यात आणली.

याच दरम्यान शहरातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी भेट देवून पाहणी केली.

खासदार मंगल अंगडी यांनी आज त्यांच्या मुली श्रद्धा आणि स्फूर्ती अंगडी यांच्या समवेत सरकारी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४१ सदाशिवनगर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

१८२६ कर्मचार्‍यांची नियुक्‍ती

महापालिकेच्या ५८ प्रभागांसाठी शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी तब्बल १८२६ कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

कर्मचार्‍यांना ने- आण करण्यासाठी २५ बसेसची सोय करण्यात आली होती. तर पोलिसांसाठीही वाहनांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे बी. के. मॉडेलचा संपूर्ण आवार गर्दीने फुलून गेला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button