बेळगाव : आयटीबीपी केंद्रातून दोन एके-47 रायफल्स चोरीला

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा : हालभावी येथील इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) केंद्रातून दोन एके-47 रायफल्स चोरीला गेल्याची नोंद काकती पोलिसांत झाली आहे. हालभावी येथील आयटीबीपी केंद्रात अन्य राज्यांतून प्रशिक्षणासाठी पोलिस येतात.

मदुराई येथील 45 बटालियनचे राजेश कुमार व संदीप मीना हे दोघेजण येथे प्रशिक्षणासाठी आले होते. ते दोन महिन्यांच्या विशेष प्रशिक्षणासाठी येथे दाखल झाले आहेत. या दोघांना केंद्राकडून प्रशिक्षणासाठी एके-47 रायफल्स् दिल्या होत्या. 17 ऑगस्ट रोजीचे दिवसभराचे प्रशिक्षण संपवून हे दोघेजण येथील तिसर्‍या मजल्यावर झोपी गेले होते. या काळात त्यांनी बाजूला ठेवलेल्या दोन्ही रायफल्स् चोरीला गेल्याचे आढळून आले.

दुसर्‍या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठ पोलिसांनी काकती पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व त्यानंतर एफआयआर दाखल करून घेतला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश, काकतीचे निरीक्षक आय. एस. गुरूनाथ यांनीही भेट देऊन माहिती घेतली. परिसरातच शोध सुरू असून अद्याप सापडल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा : 

Exit mobile version