बेळगाव : राकसकोप धरण पुन्हा ओव्हरफ्लो | पुढारी

बेळगाव : राकसकोप धरण पुन्हा ओव्हरफ्लो

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्यात आज शनिवारी दुसर्‍यांदा राकसकोप धरण ओव्हरफ्लो झाले. म्हणजेच धरण 100 टक्के भरले असून, धरणातून 710 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर अलमट्टी धरणातूनही सव्वादोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील हिडकल आणि नवीलुतीर्थ ही मोठी धरणेही 80 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

बेळगावला पाणी पुरवणारे राकसकोप धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाची क्षमता 0.592 टीएमसी असून, धरणात सध्या 590 क्यूसेक पाण्याची आवक होत असून, विसर्ग 710 ठेवण्यात आला आहे. बेळगावला पाणी पुरवणारे दुसरे घटप्रभा अर्थात् हिडकल धरणात 47.908 टीएमसी पाणी साठले आहे. धरणाची क्षमता 51 टीएमसी आहे. धरणात 29 हजार 896 क्यूसेक पाण्याची आवक होत असून, विसर्ग 26 हजार 711 आहे.

अलमट्टीची क्षमता 123 टीएमसी असून, सध्या 104 टीएमसी पाणी आहे. 1 लाख 86 हजार 296 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. मलप्रभा धरणात 30.133 टीएमसी पाणीसाठा असून, क्षमता 37.731 टीएमसी आहे.

राकसकोप धरण

Back to top button