बेळगाव : एकजुटीने महापालिकेवर मराठीचा भगवा फडकवा | पुढारी

बेळगाव : एकजुटीने महापालिकेवर मराठीचा भगवा फडकवा

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सीमालढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता असणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेला संकल्प यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रभागात समितीचे उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्राचे सीमासमन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

महानगरपालिका ही सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. यावेळीदेखील सर्व मराठी भाषिकांनी या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. गेल्या 65 वर्षांपासून बेळगाव व सीमाभागात कर्नाटक सरकारकडून अन्याय-अत्याचार होत आहेत.

भाषिक अधिकार डावलले जातात. मराठी शाळा बंद पाडून त्या ठिकाणी कन्नड शाळा सुरू करणे, कन्नड भाषेत बोलण्याची सक्ती करणे या अन्यायाविरोधात आंदोलन करणार्‍या मराठी युवकांवर राजद्रोह आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करणे. मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी फलकांवर दगडफेक करणे आदी गोष्टी दडपशाही मार्गाने केल्या जातात. तसेच मराठी चित्रपट बंद पाडले जातात. मराठी साहित्य संमेलनांना परवानगी नाकारून साहित्यिकांना प्रवेश बंदी केली जाते, असे पत्रकात आहे.

मराठी अस्मितेवर आघात करण्यासाठी बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल -पिवळा ध्वज फडकविण्यात आला आहे. भारतीय संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क व स्वातंत्र्यापासून सीमाभागातील मराठी भाषिकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या एकजुटीची वज्रमूठ दाखविण्यासाठी बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता स्थापन होणे काळाची गरज बनली आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान

मराठी माणसाची अस्मिता चिरडण्यासाठी काही कन्नड संघटनांना पुढे करून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो, असे अनेक अन्यायकारक प्रकार सीमाभागात सुरूच आहेत. मराठी भाषिकांना हद्दपार करणे हाच कर्नाटक सरकारचा अजेंडा आहे असे निदर्शनास येत आहे, असेही मंत्री शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Back to top button