बेळगाव : बिबट्यासाठी 350 एकराची छाननी | पुढारी

बेळगाव : बिबट्यासाठी 350 एकराची छाननी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सात दिवसांपासून शहरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याच्या शोधासाठी वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी 350 एकर परिसर पिंजून काढला आहे. मात्र बिबट्याचा ठावठिकाणा हाती लागला नाही. त्यामुळे वन खाते आता पुढे कोणती कार्यवाही करणार, हे पाहावे लागणार आहे.

शुक्रवार दि. 5 पासून जाधव नगर येथे बांधकाम कामगारावर हल्‍ला केल्यानंतर गोल्फ मैदानात वनखात्याकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आढळून आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला होता. गुरुवारपासून शहर परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने वनखात्याने बिबट्याच्या तपासासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी तीन ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने शोध घेण्यात आला आहे. पण उंच वाढलेल्या झाडीमुळे ड्रोन कॅमेरे अपेक्षित ठिकाणी उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे ड्रोनच्या शोधपथकालाही बिबट्याचा थांगपत्ता लागला नाही. यामुळेच वनखात्याच्या जवळपास 60 कर्मचार्‍यांनी गोल्फ मैदान परिसर धुंडाळून काढला.  सकाळी 7 वाजता सुरू करण्यात आलेली शोधमोहीम सायंकाळी 5 पर्यंत सुरू होती. मात्र, बिबट्याचा थांगपत्ता लागला नाही.

‘त्या’ 21 शाळांना आजही सुट्टी
बिबट्याची शोधमोहीम सातव्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे 21 शाळांना शनिवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गोल्फ मैदान परिसरात बिबट्याचा शुक्रवारीही शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. शनिवारीही शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 13 रोजी परिसरातील 21 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दिवसभरात 60 वनकर्मचार्‍यांच्या मदतीने 350 एकर परिसर पिंजून काढण्यात आला. ड्रोनची मदतही घेण्यात आली आहे. मात्र, बिबट्याचा कोणताही सुगावा लागला नाही.
– मल्लिनाथ कुसनाळ, वन अधिकारी

Back to top button