बेळगाव : पाटबंधारे विभागाचे पाच इंजिनिअर लाचप्रकरणी दोषी | पुढारी

बेळगाव : पाटबंधारे विभागाचे पाच इंजिनिअर लाचप्रकरणी दोषी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : धरण व कालवा बांधकामावेळी संपादित झालेल्या जागेसाठी लाच घेऊन जादा भरपाई देणार्‍या महिला अभियंत्यासह पाटबंधारे विभागाच्या पाच अभियंत्यांना न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांची साधी कैद व प्रत्येकी 70 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी 6 महिन्यांची साधी कैद देण्याचेही आदेशात नमूद आहे. चतुर्थ अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मोहन प्रभू यांनी हा आदेश बजावला.

नविलूतीर्थ येथील मलप्रभा-घटप्रभा डावा कालवा निर्मिती विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता बी. पद्मनाभ लक्ष्मीनारायणराव, नरगुंद (जि. गदग) येथील पाटबंधारे खात्याचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. बी. कवदी, नविलूतीर्थ कार्यालयातील तत्कालीन तांत्रिक सहायक तथा सहायक कार्यकारी अभियंता आनंद केशवराव मिर्जी, नविलूतीर्थ कार्यालयातील तत्कालीन महिला कनिष्ठ अभियंता श्रीमती शोभा टी. मंजुनाथ व शिरसंगी उपविभागाचे कनिष्ठ अभियंता प्रकाश फकिराप्पा होसमनी अशी शिक्षा झालेल्या अभियंत्यांची नावे आहेत.

   प्रकरण काय?

बारा वर्षांपूर्वी मलप्रभा-घटप्रभा डावा कालव्याचे काम सुरू झाले होते. यासाठी अनेकांची शेती व घरे गेली होती. त्यांना पर्यायी जागा व शेतजमीन देण्यासाठी शासनाने आदेश बजावला होता. परंतु, उपरोक्‍त अधिकार्‍यांनी जादा भरपाई मिळवून देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून लाच मागितली होती. हणमाप्पा गदीगेप्पा मादर (रा. कगदाळ, ता. सौंदत्ती) यांनी 2012 मध्ये
याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. सरकारी भूस्वाधीन कायद्यांतर्गत प्रत्येकाला जागा देण्याचा नियम असताना उपरोक्त अधिकार्‍यांनी भूसंपादन कायद्याचा भंग करत लाच देण्याची तयारी दर्शविलेल्या लाभधारकांना जादा भरपाई मिळवून दिली होती. असे करताना या सर्वांनी सरकारचा विश्‍वासघात केल्याचा ठपका ठेवत तेव्हा लोकायुक्त विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

2015 मध्ये हे प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले होते. यामधील साक्षी पुराव्यांचा आधार घेत शुक्रवारी न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले. लोकायुक्तचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक एच. जी. पाटील व जी. आर. पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेत साक्षी-पुरावे गोळा करून न्यायालयासमोर सादर केले होते.

निकाला दहा वर्षांनी
सन 2012 मध्ये घडलेल्या प्रकरणाचा तब्बल दहा वर्षांनी निकाल लागला आहे. या प्रकरणात शिक्षा झालेल्या पाच अभियंत्यांपैकी एम. बी. कवदीसह अन्य दोघेजण निवृत्त झाल्याचे समजते. शिवाय सहा आरोपीपैकी एकाचे नाव यामध्ये का नाही? याची माहिती घेतली असता ते मृत पावल्याचे समजते. शिवाय या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन लोकायुक्त उपअधीक्षक एच. जी. पाटील व जी. आर. पाटील हे देखील निवृत्त होऊन पाच वर्षे लोटली आहेत.

Back to top button