बेळगाव : भर पावसात मराठी बाणा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन | पुढारी

बेळगाव : भर पावसात मराठी बाणा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेली 65 वर्षे सुलतानी संकटाशी दोन हात करणार्‍या मराठी माणसाने सोमवारी (दि. 8) अस्मानी संकटाचा सामना करत ध्येयापासून मागे हटणार नाही, असे दाखवून दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठी कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी करत मुसळधार पावसात ठिय्या आंदोलन करत पोलादी इरादे व्यक्‍त केले.

सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतूनही सरकारी कागदपत्रे देण्यात यावीत, सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला असतानाही मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी साडेदहा वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक दाखल झाले होते. आंदोलनस्थळावर म. ए. समितीचे फलक लावण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी मराठी माणसांची इच्छाशक्‍ती कायम होती. सकाळी साडेअकरा वाजता ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत भर पावसात मराठी भाषिक थांबून होते. बेळगाव शहरासह तालुका, खानापूर तालुक्यातून मराठी भाषिक आले होते.

आमच्या लढ्याला सुरुवात

आंदोलकाना संबोधित करताना मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, मराठीतून सरकारी कागदपत्रे मिळणे हा आमचा अधिकार आहे. हे सरकार आपलाच कायदा अंमलात असण्यास कचरत आहे. मराठी भाषिकांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत; पण आजपासून आमचा लढा सुरू झाला आहे. आज फक्‍त ठिय्या आंदोलन करून आम्ही शांत बसणार नाही. तर प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीसमोर आंदोलनाची साखळी सुरू करण्यात येणार आहे. आमच्यावर कितीही संकटे आली तरी आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार.

हलणार नाही

सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्‍कांवर कितीही गदा आणली तरी आम्ही गप्प बसणार नाही. संघर्षाशिवाय आम्हाला न्याय मिळत नाही. हा आमचा इतिहास आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. उच्च न्यायालयाने आदेश बजावला. त्याची अंमलबजावणी सरकारला येत नाही. स्वत:च्या कायद्याचे पालन करता येत नाही, अशा सरकारला मराठी माणसांवर असलेल्या राग दिसून येतो. पण, आम्ही मागे हटणार नाही. कितीही संकटे आली तरी न्यायासाठी रस्त्यावर उतरणारच. आता आमचा लढा सुरू झाला असून मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे फिरणार नाही, अशी ग्वाही कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.

माजी महापौर शिवाजी सुंठकर, जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, जगन्नाथ बिर्जे, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, बाळासाहेब देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.

समिती नेते प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, आर. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, एस. एल. चौगुले, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. एम. जी. पाटील, मनोज पावशे, किरण सायनाक, सुधा भातकांडे, महादेव पाटील, मदन बामणे, शिवानी पाटील, साधना पाटील, माधुरी हेगडे, आर. के. पाटील, निंगाप्पा जाधव, महेश जुवेकर, बाबू कोले, नितीन खन्नूकर, श्रीकांत मांडेकर, ईश्वर गुरव, माणिक होनगेकर, दिगंबर पवार, चेतन पाटील, बाबाजी देसूरकर, निंगाप्पा मोरे, अप्पासाहेब गुरव, मनोहर हुक्केरीकर, मयूर बसरीकट्टी, विकास कलघटगी, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, रामचंद्र मोदगेकर, गोपाळ पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, राजू पावले, विनायक पाटील, लक्ष्मण नाईक, सुधाकर चाळके यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते.

Back to top button