बेळगाव : अधिकृत पत्रकारांना देणार सरकारी ओळखपत्र; बोगस पत्रकारांना बसणार आळा | पुढारी

बेळगाव : अधिकृत पत्रकारांना देणार सरकारी ओळखपत्र; बोगस पत्रकारांना बसणार आळा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अनेक भागात यू ट्युब चॅनेल आणि बोगस पत्रकारांचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे वृत्त विभागाच्या यादीतील माध्यम संस्थांच्या वतीने क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकारांनाच जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. प्रेस नावाचा गैरवापर करणार्‍यांना यामुळे आता आळा बसणार आहे.

बोगस पत्रकार आणि प्रेस या नावाच्या गैरवापरावर नियंत्रणासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्‍त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, माध्यम संस्थांनी दिलेल्या शिफारस पत्राच्या आधारे त्या संस्थेच्या पत्रकाराला जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येईल. अशा व्यक्तींनाच सरकारी कार्यक्रम आणि सभांना परवानगी दिली जाणार आहे. याबाबतची माहितीही सर्व विभागांना देण्यात येणार आहे. माध्यम संस्थांनीही याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यातील माध्यम संस्थांनी त्यांच्या वार्ताहरांचे नाव, ओळखपत्र व इतर तपशील आठवडाभरात माहिती विभागाकडे पाठविल्यास त्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे वृत्त विभागाच्या यादीतील तालुकास्तरीय वार्ताहरांनाही ते प्रतिनिधित्व करत असलेल्या माध्यम संस्थेच्या शिफारशीच्या आधारे तहसीलदार आणि वृत्त विभागामार्फत ओळखपत्र दिले जाईल. संबंधित तालुक्याच्या पत्रकारांना दिले जाणारे ओळखपत्र केवळ संबंधित तालुक्याच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित असणार आहे. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख संजीव पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी प्रास्ताविक केले.

कारवाईची मागणी

स्वयंघोषित यू ट्युब चॅनेल आणि बोगस पत्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेक माध्यम प्रतिनिधींनी केली.

यू ट्युब चॅनेलला परवानगी नाही

यू ट्युब चॅनेल आणि सोशल नेटवर्क्सना ओळखपत्र दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना अधिकृत माध्यम संस्थांच्या पत्रकारांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.

Back to top button