बेळगाव : कंग्राळीचा कलमेश्‍वर; गावावर मायेची नजर | पुढारी

बेळगाव : कंग्राळीचा कलमेश्‍वर; गावावर मायेची नजर

कंग्राळी (खु.); अश्‍विनकुमार पाटील :  येथील ग्रामदैवत श्री कलमेश्‍वर पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भव्य आणि आकर्षक मंदिर, भक्तांना अभय देणारी देव कलमेश्‍वराची मूर्ती, रोज होणारे धार्मिक कार्यक्रम यामुळे मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. ग्रामदैवताचा मान मिळाला आहे.

गावाच्या मध्यभागी असणारे कलमेश्‍वर मंदिर पुरातन आहे. मंदिराचे पुजारी व गावातील जाणकार यांच्या माहितीनुसार मंदिराला किमान 600 वर्षांचा इतिहास लाभला आहे. ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

श्रावण महिन्यात याठिकाणी रोजच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. याठिकाणी सकाळ, संध्याकाळ धार्मिक विधी होतात. एरव्ही प्रत्येक सोमवारी मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला असतो. मंदिरातील गाभार्‍यात श्री महादेवाची पिंडी आहे. त्यावर मुखवटा असून फणाधारी नागदेवता व समोर नंदी आहे. मूर्ती पूजाविधी हक्क हिरेमठ भावकी (पुजारी) यांचेकडे आहेत. गावडे व इतर सर्व ग्रामस्थ यासाठी सहकार्य करतात. नियमित पूजा विधीसाठी पुजारी भावकीला प्रतिफळ म्हणून काही जमिनीचे क्षेत्र कायमस्वरूपी ताब्यात दिले आहे. मंदिर देखभालीची जबाबदारी श्री कलमेश्वर मंडळांकडे आहे.

श्रावणातील तिसर्‍या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अनेक भाविक श्रद्धेने सहकार्य करतात. दहा हजारपेक्षा जास्त भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादासाठी बनवलेली खपली गव्हाची खीर वैशिष्ट्यपूर्ण असते.

मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मंदिरात गुढी पाडव्या रोजी गावडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातील वार्षिक हक्कदार बदलले जातात. गावातील वर्षभराचे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम जबाबदारीने पार पाडण्याची कबुली देतात. त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.

600 वर्षांचा इतिहास
मंदिराला सुमारे 600 वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी हे मंदिर जुन्या पद्धतीचे कौलारू मंदिर होते. गावकरी आणि भाविकांच्या सहकार्यातून अलीकडे मंदिराचा 2004-05 मध्ये
जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर भव्य आणि आकर्षकरित्या बांधण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत.

 पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी
मंदिरात वर्षभर प्रत्येक सोमवारी हजारो भाविक कलमेश्वर देवाचे दर्शन घेतात. श्रावण महिन्यात याला उधाण आलेले असते. पहाटे 5 वा. पासून अभिषेक, आरती पूजा विधी होतात. रात्री 10 वाजेपर्यंत भाविक दर्शनसाठी गर्दी करतात.

दसर्‍याचे आकर्षण
दसरा सण मंदिराच्या आवारात उत्साहाने साजरा केला जातो. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येतेे. दहा दिवस देवाच्या पालखीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून गार्‍हाणा घातला जातो. विजयादशमी रोजी देवाची पालखी व सासनकाठी गावाच्या सीमेवरील सर्व देवदेवतांच्या स्थानांना धावत जाऊन भेट घेण्यात येते. मध्यरात्री मंदिरामध्ये पालखी ठेवली जाते. नवरात्र उत्सवात मंदिराच्या आवारात भजनासह शालेय विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासासाठी स्पर्धा घेतल्या जातात. मंदिराचा महिमा वाढत असल्याने गावकर्‍यांसह परिसरातील भाविकांची गर्दी याठिकाणी वाढत आहे. त्यानुसार मंदिर व्यवस्थापन कमिटीकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. याला भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे.

श्री कलमेश्वर मंदिर पुरातन असून जागृत आहे. मंदिराला सुमारे 600 वर्षांचा इतिहास लाभला आहे. मंदिरात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
– शंकर पाटील, हभप

Back to top button