बेळगाव : दीड दशकांपासून रिंगरोड भिजत, किती बळी हवेत?

बेळगाव : दीड दशकांपासून रिंगरोड भिजत, किती बळी हवेत?
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  शहरात लवकरच रिंगरोड होणार, अशी घोषणा करण्याची राजकीय नेत्यांची फक्त स्टंटबाजी सुरू आहे की काय? या शंकेपलिकडे आता रिंगरोडपुराण गेले आहे. तब्बल दिड दशक उलटून गेले तरी रिंगरोडचे काम काही सुरू झालेले नाही अन् शहरातील अवजड वाहनाखाली सापडून मृत्यूचे प्रमाण काही घटत नाही. तीन दिवसांत दोन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेला पाठवायचे की नाही? या प्रश्‍नाचे उत्तर बेळगावच्या खासदार मॅडम व शहराचे तिन्ही आमदार देणार का?

सन 2006 पासून रिंगरोडची चर्चाच होते आहे. प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जातो. परंतु, इच्छाशक्तीचा अभाव असल्याने रिंगरोड अस्तित्वात येत नाही. 16 वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या खर्चाचा आराखडा 350 कोटींचा होता, आठ वर्षांपूर्वीचा आराखडा 800 कोटींचा होता, तो आता 1300 कोटींपर्यंत पोहोचला आहे. आता राज्य नव्हे तर केंद्र सरकारकडूनच रिंगरोड केला जाणार असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जाते. पंधरवड्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगावच्या रिंगरोडला हिरवा कंदिल दिल्याची माहिती बेळगावातील भाजपच्या नेत्यांनी, आमदारांनी दिली होती. परंतु, प्रत्यक्षात काम मात्र सुरू होत नाही.

 
अनेक प्रयोग व्यर्थ
शहरातील अवजड वाहनांखाली येऊन अनेक जणांचा बळी गेला आहे. उद्यमबाग, कॉलेज रोड, खानापूर रोडसह अनेक ठिकाणी दुचाकीस्वार विद्यार्थी, तरुणांचा बळी गेला आहे. शाळकरी मुले, युवक अवजड वाहनांचे बळी ठरले आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी शहरातील वाढते अपघात लक्षात घेऊन सकाळी 8 ते 11 व सायंकाळच्या टप्प्यात 4 ते 8 अशा दोन टप्प्यात शहरातील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला होता. गोव्याकडून येणार्‍या वाहनांसाठी पिरनवाडीच्या बाहेर तर महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांसाठी काकतीजवळ ट्रक टर्मिनल बनवून वाहने थांबवली जात होती. परंतु, हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. असाच प्रयोग पहिले पोलिस आयुक्त व तत्कालीन आयजीपी भास्कर राव यांनीही करून पाहिला. परंतु, शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांची संख्याच इतकी आहे की त्यावेळीही हा प्रयोग फसला.

 रहदारी पोलिस खात्याचे दुर्लक्ष
पोलिस आयुक्तालय होण्यापूर्वी आणि आतादेखील शहरासाठी दोनच रहदारी पोलिस ठाणी आहेत. ती आणखी दोन वाढवावीत, अशी मागणी असूनही पोलिस खाते व शासनाने दखल घेतलेली नाही. वाहतूक पोलिस खात्याकडे कमी पोलिस बळ व शहराचा वाढलेला विस्तार यामुळे अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही. कोणी ट्रकचालक धोकादायक सळ्या भरून, उघड्यावर वाळू, सिमेंट किंवा तत्सम वस्तू घेऊन जात असेल, त्याला थांबवून विचारण्याची तसदी देखील वाहतूक पोलिस घेत नाहीत.

कॅम्प रस्ता हवा रूंद
संपूर्ण शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते होत असताना धर्मवीर संभाजी चौक ते ग्लोब थिएटरपर्यंतचा रस्ता अद्यापही अरूंदच आहे. या या रस्त्यावर एखादे अवजड वाहन जात असेल तर त्याच्या पाठीमागून पुढे दुचाकी देखील जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. हा भाग कँटोन्मेंटमध्ये येतो. परंतु, लोकप्रतिनिधी कँटोन्मेंटमधील व्होटबँक दुखवायला नको म्हणून या रस्ता रूंदीकरणाकडे लक्ष देताना दिसत नाहीत. येथे एका चिमुकल्याचा हकनाक बळी गेला आहे. यावरून बोध घेऊन आता हा रस्ता रूंद होण्याची गरज शहरवासी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news