बेळगाव : कडोलीच्या कलमेश्‍वराचा आठव्या शतकापासून महिमा | पुढारी

बेळगाव : कडोलीच्या कलमेश्‍वराचा आठव्या शतकापासून महिमा

कडोली; सहदेव फडके :  बेळगावचा परिसर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. काही पौराणिक उल्लेखही बेळगावबाबत आढळतात. पौराणिक उल्लेखांचे दाखले उपलब्ध नसले तरी ऐतिहासिक वास्तूंचे दाखले उपलब्ध आहेत. अशाच ऐतिहासिक वास्तूंपैकी एक म्हणजे कडोली गावातील पुरातन कलमेश्‍वर मंदिर.

गावकर्‍यांसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ते ओळखले जाते. सुमारे 8 व्या शतकापासून हे मंदिर असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येतो.

श्रावणात पूजा, अभिषेक, आरतीसह वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. दसरोत्सव वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. गाव सजवण्यात येते. यादरम्यान उभारण्यात येणारी बन्नी भाविकांसह अभ्यासकांना खुणावते. गावच्या मध्यभागी पारंपरिक पद्धतीने मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. जुने वैभव अंगावर मिरवत मंदिर उभे आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

ऐतिहासिक दसरोत्सव
मंदिरात दरवर्षी दसरा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. दसरा काळात रोज धार्मिक विधी, पूजा, पालखी, आरती, भजन, सनई, तुतारी यांची रेलचेल असते. रोज कलमेश्वर मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात येतो. आरतीला ग्रामस्थांसह परिसरातील भाविक उपस्थित असतात. नवव्या दिवशी बन्नीची उभारणी करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे ही बन्नी कसल्याही आधाराशिवाय उभारली जाते.

वैशिष्ट्यपूर्ण बन्नी
दसरोत्सवात बांधण्यात येणारी बन्नी वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखली जाते. महाप्रसादाचे वाटप करून केळीची झाडे कापण्यासाठी हक्‍कदार जातात. यासाठी फळे, फुले, पाच प्रकारची वाढलेली कडधान्ये, बांबुच्या तट्या, काटे, रंगीबेरंगी पताक्या, नाचण्याची आंबील आदींचा वापर करण्यात येतो.

पुरातन मंदिर
कलमेश्‍वर मंदिर पुरातन असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येतो. काही अभ्यासकांनी 8 व्या शतकापासून मंदिर असल्याचे सांगितले आहे. हेळवी समाजाच्या नोंदीनुसार 1155 पासून मंदिर अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते.

मंदिर पुरातन आहे. परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून वर्षभर याठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परिसरातील भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
– चिदंबर पट्टणशेट्टी, पुजारी

Back to top button