बेळगाव : दोन वर्षांनंतर 25 पासून धावणार पॅसेंजर | पुढारी

बेळगाव : दोन वर्षांनंतर 25 पासून धावणार पॅसेंजर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर मिरज-बेळगाव मार्गावर पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. 25 ऑगस्टपासून हुबळी-मिरज, कॅसलरॉक-मिरज आणि लोंढा-मिरज या तीन गाड्या धावणार आहेत. एकूण 29 रेल्वे स्टेशनना आता सहा पॅसेंजर गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जून 2020 मध्ये टप्प्याटप्याने या तीन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. वर्षानंतर एक्स्प्रेस गाड्या टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. मात्र दोन वर्षे उलटली तरी पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या होत्या. पॅसेंजर गाड्या पुणे विभागाच्या असल्यामुळे आणि त्यांनी या गाड्या अन्य मार्गाने वळवल्याने हुबळी विभागाला पॅसेंजर सोडण्यासाठी गाडी उपलब्ध होत नव्हती.

पॅसेंजर गाड्या बंद झाल्यामुळे बेळगाव ते मिरज मार्गावरील सोळा रेल्वे स्टेशन ओस पडले होते. बेळगाव-मिरज पॅसेंजरच्या अभावाने सुमारे दोन हजारहून अधिक मजुरांचा रोजगार बुडाला होता. भाजी विक्रते, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचेही हाल सुरु होते. या गाड्या सोडण्यात याव्यात म्हणून सामाजिक संघटना आणि हुबळी विभागाच्या रेल्वे प्रशासनाने पुणे विभागाशी सातत्याने पत्रव्यावहार सुरु ठेवला होता. यामुळे अखेर 25 ऑगस्टपासून या पॅसेंजर गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दक्षिण पश्‍चिम रेल्वे विभागाकडून या पॅसेंजर गाड्या सोडण्यात येत आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकात मात्र बदल करण्यात आला आहे. या पॅसेंजर गाडीमध्ये एकूण 11 डबे असणार आहेत. यामध्ये प्रवाशासाठी 9 तर मालवाहतूक आणि इतर साहित्यासाठी दोन डबे असणार आहेत.

पॅसेंजरचे वेळापत्रक

हुबळी-मिरज (क्र. 17332) : 25 ऑगस्टपासून धावणार, हुबळीहून सुटणार सकाळी 10. 30 वा. मिरजला पोहोचणार सायंकाळी 6.30 वा.
मिरज-हुबळी (क्र.17331) : 27 ऑगस्टपासून धावणार, मिरजहून सुटणार सकाळी 6.10 वा. हुबळीला पोहोचणार दुपारी 3 वा.
मिरज-कॅसलरॉक (क्र. 17333) : 26 ऑगस्टपासून धावणार मिरजहून सुटणार सकाळी 10.15 वा. कॅसलरॉकला पोहोचणार सायंकाळी 4.30 वा.
कॅसलरॉक-मिरज (क्र. 17334) : 26 ऑगस्टपासून धावणार कॅसलरॉकवरुन सुटणार सायंकाळी 5 वा. मिरजला पोहचणार रात्री 11.40 वा.
मिरज- लोंढा (क्र. 0751) : 25 ऑगस्टपासून धावणार. मिरजहून सुटणार सायंकाळी 7 वा. लोंढा येथे पोहोचणार रात्री 11.55 वा.
लोंढा- मिरज (क्र.07352) : 26 ऑगस्टपासून धावणार, लोंढ्याहून सुटणार सकाळी 5 वा. मिरजला पोहोचणार सकाळी 9.45 वा.

Back to top button