निपाणीत हर हर महादेवचा गजर | पुढारी

निपाणीत हर हर महादेवचा गजर

निपाणी;  पुढारी वृत्तसेवा :  हर हर महादेवच्या गजरात निपाणी परिसरातील विविध शिव मंदिरांत पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील पुरातन महादेव मंदिरात पहाटे चारपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार व भाविकांच्या हस्ते शिवलिंगास अभिषेक घालण्यात आला.

विविध व्रतवैकल्यांचा महिना म्हणून या मासाकडे पाहिले जाते. मल्लिकार्जुन गडकरी व रूपा गडकरी या दाम्पत्याच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

हिमालय पर्वतामध्ये शिवलिंगाची नंदी आरुढ पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा नितीन गुरव, सचिन सुतार व किरण भालेभालदार यांनी मांडली. महादेव मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी सुनील पाटील, सदानंद चंद्रकुडे, शिवकांत चंद्रकुडे, महादेव पाटील, शिवरुद्र पाटील, बाबासाहेब चंद्रकुडे, चंद्रकांत तारळे, चंद्रकांत कोठीवाले, संजय मोळवाडे, अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, महेश दिवाण आदी उपस्थित होते. सायंकाळी महादेवाची पालखी मिरवणूक काढण्यात आले.
मंगळवार पेठ येथील महादेव मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. प्रगतीनगर येथील महादेव मंदिरात परिसरातील भाविक दर्शनासाठी आले होते.

शिप्पूर येथील रामलिंग मंदिरात ही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आडी मल्‍लया डोंगरावर मल्लिकार्जुन देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी डोंगर चढून दर्शन घेतले. शिवमय वातावरणात पहिला श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्रावण मासानिमित्त बाजारपेठेत विविध फळे- फुलांची आवक वाढली आहे. बेल व फुले विक्री करण्यासाठी महादेव मंदिराच्या बाहेर विक्रेत्यांनी स्टॉल मांडले होते. बाजारपेठेत श्रावणातील उपवासासाठी लागणारे साबुदाणे, वरीचे तांदूळ, केळी व बटाट्याचे वेफर्स तसेच विविध फळे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Back to top button