बंगळूर : चौकशीनंतर संशयितांना सोडले | पुढारी

बंगळूर : चौकशीनंतर संशयितांना सोडले

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) चौकशी करून सोडून दिले. त्यांना अधिक चौकशीसाठी दिल्लीला येण्याची नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

तुमकूर येथे अटक करण्यात आलेल्या साजिद मक्रानीची चौकशी करून सोडून देण्यात आले. तो मूळचा महाराष्ट्रातील आहे. सदाशिवनगर फेज 9 मध्ये रंगस्वामी यांच्या भाडोत्री घरामध्ये तो चार मित्रांसोबत राहतो. रविवारी पहाटे चारच्या दरम्यान एनआयएच्या वीस अधिकार्‍यांनी छापा घालून त्याला ताब्यात घेतले.  त्याची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या. तुमकुरातील युनानी मेडिकल कॉलेजमध्ये साजिद शिकतो. याविषयी प्राचार्यांनी प्रतिक्रिया देताना साजिद हा तीन वर्षांपासून कॉलेजमध्ये शिकत असल्याचे सांगितले. तो शेवटच्या वर्षात शिकत आहे. संशयावरुन त्याला एनआयएने ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

भटकळ (जि. कारवार) येथील एका संशयिताला एनआयएने रविवारी पहाटे ताब्यात घेतले होते. सायंकाळपर्यंत त्याची चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आले. त्याच्याकडून ठोस माहिती मिळाली नसल्याने सायंकाळी 8 वाजता सोडून देण्यात आले. अधिक चौकशीसाठी दिल्लीला येण्यासाठी त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

Back to top button