बेळगाव : गर्लफे्रन्ड कोणाची? यावरून तरुणांच्या दोन गटांत राडा | पुढारी

बेळगाव : गर्लफे्रन्ड कोणाची? यावरून तरुणांच्या दोन गटांत राडा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  येथील पवन हॉटेलसमोरील सिटी पोलिस लाईन रस्त्यावर तरुणांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. एका गटातील तरुणावर छोट्या चाकूने पाठीत वार करून जखमी केले, दुसर्‍या गटातील तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारल्याने तो जखमी झाला. तरुणीच्या वादातून हे भांडण झाल्याचे कॅम्प पोलिसांनी सांगितले.

श्रीहरी बसवंतराय तवगमठ (वय 20, रा. गुटगुद्दी) व परशुराम गाडीवड्डर (19, रा. घटप्रभा) अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
हे सर्व तरुण शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. त्यांच्यासोबत शिकणारी युवती कोणाची गर्लफ्रेन्ड यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहे.

याच वादातून हे सर्वजण सोमवारी सायंकाळी येथील कॉलेज रोडवर जमले. या ठिकाणी त्यांच्यात कॉलेजमध्ये शिकणार्‍या एका युवतीवरून भांडण सुरू झाले. यानंतर दोन्ही गटातील तरुण पळत पवन हॉटेलसमोरील सिटी पोलिस लाईन रस्त्यावर गेले. येथे पुन्हा त्यांच्यात वादावादी होऊन भांडण सुरू झाले.

एका गटातील तरुणाने श्रीहरी याच्या पाठीत चाकूने वार केला, यावेळी दुसर्‍या गटातील तरुणानेही परशुराम याच्या डोकीत लोखंडी रॉडने मारले. ही माहिती कॅम्प पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button