बेळगाव : कॉलेज युवतीला ट्रकने चिरडले | पुढारी

बेळगाव : कॉलेज युवतीला ट्रकने चिरडले

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कॉलेजला निघालेल्या युवतीच्या दुचाकीला ट्रकचा धक्‍का लागून तिची काकू एका बाजूला पडली, तर तरुणी दुसर्‍या बाजूला पडली. ट्रकचे चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली.

सादिया शब्बीरअहंमद पालेगार (वय 17, मूळ रा. बसवणकुडची, सध्या रा. अशोकनगर, बेळगाव) असे मृत युवतीचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास किल्ल्याजवळील जुन्या भाजी मार्केटजवळ ही दुर्घटना घडली. यामुळे शहरातील अवजड वाहनांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर युवती तिच्या काकूसोबत दुचाकीवरून भरतेश कॉलेजकडे येत होती. अशोकनगर येथून जुना भाजीपाला मार्केट रोडवरून या दोघी जिजामाता चौकाकडे निघाल्या होत्या. यावेळी वाळूचा ट्रक वंटमुरीहून जिजामाता चौकाकडे निघाला होता. दुचाकीच्या हँडलला ट्रकचा किंचितसा धक्‍का लागल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने  दोघीही रस्त्यावर कोसळल्या. परंतु, काकू उजव्या बाजूला तर सादिया ही डाव्या बाजूला पडल्याने ती थेट ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आली. तिच्या डोकीवरून चाक गेल्याने जागीच ठार झाली. ती अकरावीत शिकत होती.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभागाचे निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणातील ट्रकचालक महबूब इमामसाब बाहेरगल्ली (रा. खानापूर) याला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. निरीक्षक गाबी तपास करत आहेत.

Back to top button