बेळगाव : सव्वासात लाखांचा रेशन तांदूळ जप्‍त | पुढारी

बेळगाव : सव्वासात लाखांचा रेशन तांदूळ जप्‍त

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हुंचेनहट्टी व पिरनवाडी येथे साठवून ठेवलेला रेशनचा तांदूळ पोलिसांनी जप्‍त केला. 31 टन 350 किलो इतका तांदूळ असून याची किंमत 7 लाख 21 हजार 50 रु. होते. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये वासिम इमामसाब मुजावर (रा. शिक्षक कॉलनी, हुंचेनहट्टी) व संजय सुबराव भोसले (रा. जांबोटी रोड, पिरनवाडी) यांचा समावेश आहे.

उपरोक्‍त दोघा संशयितांनी ते राहात असलेल्या ठिकाणी रेशनवर दिला जाणारा तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. पोलिस आयुक्‍त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडाडी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, वडगावचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी सहकार्‍यांसह जाऊन येथे छापा टाकला. त्यांच्यासमवेत अन्‍न व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक जी. व्ही. बागोजीकोप्प हेदेखील होते. उपरोक्‍त दोघा संशयितांच्या घरात 31 टनांहून अधिक तांदूळ सापडला.

तो पोलिसांनी जप्‍त केला असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत पोलिस आयुक्‍तांनी वडगाव पोलिस ठाण्याच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

Back to top button