निपाणीत उभारणार डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र | पुढारी

निपाणीत उभारणार डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  निपाणीत डॉ. आंबेडकर स्मारक व संशोधन केंद्र उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जागेची पाहणी केली जात आहे.

सरकारने यंदाचा अर्थसंकल्प जाहीर करताना राज्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून डॉ. आंबेडकर यांनी राज्यात भेटी दिलेल्या प्रमुख 10 ठिकाणी स्मारक, संशोधन केंद्र तसेच वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, चिकोडी व निपाणी अशा तीन ठिकाणी स्मारक व संशोधन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या तिन्ही ठिकाणी डॉ. आंबेडकर यांनी भेटी देऊन काहीकाळ वास्तव्य केले होते.

सन 1945 ते 1949 या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निपाणीस दोनवेळा भेटी दिल्या होत्या. येथील जुना पी. बी. रोडनजीक असलेल्या चर्चच्या मागील बाजूच्या जुन्या इमारतीमध्ये त्यांचे वास्तव्य होते. येथे बाबासाहेबांनी संस्थानिकांबाबतचे धोरण व म्हैसूर प्रांतातील विविध सामाजिक घटनांचा अभ्यास केला होता. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर त्यांच्या दोन सभा झाल्या होत्या. याची आठवण म्हणून सदर स्मारक व संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.
तहसीलदार, तालुका समाजकल्याण अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, सामाजिक कार्यकर्ते जागेची पाहणी करत आहेत. कमिटीकडून सध्या जागेचा शोध सुरू असून, 5 ते 10 एकर परिसरात भव्य असे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निपाणीत डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय कौतुकास्पद आहे. यातून आंबेडकरी चळवळीला आणि येणार्‍या पिढीला वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न होईल.
– प्रा. सुरेश कांबळे

Back to top button