खानापूर-रामनगर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावा | पुढारी

खानापूर-रामनगर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावा

खानापूर : पुढारी वृत्तसेवा : खानापूर-रामनगर महामार्गाच्या अर्धवट कामामुळे परिसरातील जनता त्रासली आहे. धोकादायक खड्ड्यांनी प्रवास जीवावर बेतत आहे. त्याकरिता उर्वरित रस्ता कामाला त्वरित सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाच्या धारवाड कार्यालयातील अधिकार्‍यांकडे केली.
खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले. खानापूर ते रामनगर पर्यंत महामार्ग निर्माण करण्याचे काम चार वर्षापासून विविध कारणांनी रखडलेले आहे. या महामार्गावर अवलंबून असणार्‍या आजूबाजूच्या 40 ते 50 गावांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्ही.बी.म्हात्रे इन्फ्रा या कंपनीला हा महामार्गाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीकडून येत्या पंधरा दिवसांत खड्ड बुजवून पावसाळ्यानंतर महामार्गाचे काम मार्गी लावण्यात येणार आहे, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिली.

निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवण्यात आली. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पी. एच. पाटील, बळीराम पाटील, निरंजन सरदेसाई, राजू पाटील, राजाराम देसाई, भुपाल पाटील, किशोर हेबाळकर आदी उपस्थित होते.

Back to top button