बेळगाव : परराज्यातील विद्यार्थ्यांना कन्‍नड सक्‍ती नाही | पुढारी

बेळगाव : परराज्यातील विद्यार्थ्यांना कन्‍नड सक्‍ती नाही

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : राणी चन्‍नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयू) व्याप्‍तीत येणार्‍या पदवी महाविद्यालयांमध्ये 2021?22 या शैक्षणिक वर्षापासून केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा अवलंब करण्यात येणार आहे. परराज्यातून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना कन्‍नड विषय सक्‍तीचा असणार नाही, अशी माहिती कुलगुरू प्रा. रामचंद्रगौडा यांनी दिली. वार्ता खात्याच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र सरकारने शिक्षण पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवालावरून एकरूप शिक्षण पद्धत अंमलात आणली आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन कर्नाटकात नवीन शिक्षण धोरण अवलंबण्यात येणार आहे. 2021 ? 22 या शैक्षणिक वर्षापासून राणी चन्‍नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या पदवी महाविद्यालयांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नवीन शिक्षण धोरणात ज्ञान, उद्योग व कौशल्याला अनुसरुन अभ्यासक्रम असणार आहे. या शिक्षण धोरणानुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अनेक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. पदवीला प्रवेश घेतलेल्या एक वर्षात काही कारणास्तव शिक्षण सोडावे लागल्यास प्रमाणपत्र देण्यात येईल.

दोन वर्षांनंतर डिप्लोमा प्रमाणपत्र, तीन वर्षांनंतर पदवी, चार वर्षांनंतर सन्मान पदवी यानंतर थेट पदव्युत्तर अथवा पीएचडी प्रवेश दिला जाणार आहे. एका विषयात प्राविण्य मिळावे यादृष्टीने अभ्यासक्रम व विषय निवड करण्याची सोय करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षापासून नवीन शिक्षण धोरण पदवी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे कुलगुरु प्रा. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.

यावेळी निबंधक बसवराज पद्मशाली, प्रा. डी. एन. पाटील, निबंधक प्रा. एस. एम. हुरकडली, प्रा. डॉ. एम. जयाप्पा आदी उपस्थित होते.

परराज्यातील विद्यार्थ्यांना विषयनिवडीचे स्वातंत्र्य

राणी चन्‍नम्मा विद्यापीठामध्ये महाराष्ट्र, गोवा यासह इतर राज्यांतील विद्यार्थी पदवी शिक्षण घेत आहेत. त्यांना कन्‍नड विषयाची सक्‍ती असणार नाही. ऐच्छिक विषय निवडण्याची सोय आहे. सरकारच्या मार्गसूचीनुसार प्रवेश दिला जाणार असून, याबाबतही सरकार पातळीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे कुलगुरू प्रा. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.

Back to top button