बेळगाव : मराठी फलक उभारणे गुन्हा आहे का? | पुढारी

बेळगाव : मराठी फलक उभारणे गुन्हा आहे का?

उचगाव;  पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे उचगाव हे 100 टक्के मराठी भाषिक गाव आहे. त्यामुळे गावातील स्वागत कमानीवर मराठीतून मजकूर लिहिणे आणि सीमाभागात मराठी फलक उभारणे गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल गावकर्‍यांतून विचारण्यात येत आहे.

गावच्या वेशीत ग्राम पंचायतीने उभारलेल्या स्वागत कमानीवरील मराठी भाषेतील मजकुरामुळे कर्नाटक प्रशासनाचा तीळपापड होत आहे. फलकावर 60 टक्के भागात कन्नडमध्ये अक्षरे लिहावीत, तर 40 टक्के भागात मराठी अक्षरे लिहावीत, अशी भूमिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र प्रशासनाचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार गावकर्‍यांनी घेतला आहे. तशी भूमिका गुरुवारी होणार्‍या बैठकीतही मांडली जाणार आहे.

संपूर्ण परिसर मराठी भाषिक असून मराठी भाषिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र कर्नाटक शासन या फलकाच्या निमित्ताने मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. मराठी भाषिक त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय गप्प राहणार नाहीत. आम्ही आमच्या भाषेत फलक लावायचा नाही!
– बाळासाहेब देसाई, उचगाव.

मराठी भाषिकांना जाणून बुजून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र मराठी भाषिक कदापि गप्प बसणार नाहीत. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी जरी जाणूनबुजून मराठी भाषिकांना त्रास देण्याचा जर प्रयत्न केला, तर त्यांची वेळ आल्यानंतर योग्य जागा दाखविल्याशिवाय मराठी जनता गप्प बसणार नाही.
आर. एम. चौगुले म. ए. समिती युवा नेते

हा भाग मराठी असल्याने मराठीतून फलक लावला आहे. कन्नड भाषेतही मजकूर आहे. त्यामुळे प्रशासनाने आक्षेप घेणे चुकीचे आहे. ग्रा. पं. ने ही कमान उभारली आहे. त्यावेळी कोणत्याही अधिकार्‍यांनी आक्षेप घेतला नाही. आताच आक्षेप येतो. मराठी भाषिकांनी संघटित होण्याची गरज आहे.
– एल. वाय. लाळगे, उचगाव.

Back to top button