निपाणी : प्लास्टिक बंदी यशस्वी होण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज | पुढारी

निपाणी : प्लास्टिक बंदी यशस्वी होण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज

निपाणी;  पुढारी वृत्तसेवा :   केंद्र शासनाने 1 जुलैपासून देशभरात पातळ प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे निपाणी शहरातील विविध व्यापार्‍यांची कुचंबना झाली आहे. ग्राहकांना आपल्या मालाची विक्री प्लास्टिक पिशव्यातूनच करण्याची सवय दुकानदारांना लागली असून ग्राहकांना देखील कापडी पिशव्या नेण्याची सवय नाही. त्यामुळे बाजारपेठेत किराणा दुकानदार, बेकरी व्यावसायिक, मटण, चिकन व अंडी विक्रेते, धान्य व्यापारी यांच्याकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. ग्राहकांनी आपली मानसिकता बदलल्याशिवाय प्लास्टिक बंदी यशस्वी होणार नाही, असे मत व्यक्‍त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्लास्टिक बंदीविरोधात कडक पावले उचलली जात असून, निपाणी शहरातही या प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने कडक धोरण अवलंबिले आहे. शहरात 1 जुलैपासून कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत सातवेळा कारवाई करण्यात आली असून 52 किलो प्लास्टिक जप्त करून 30 हजार रुपयांचा दंड नगरपालिकेने वसूल केला आहे.

एकीकडे केंद्र सरकारचे नियम वेगळे व प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचे असलेले नियम वेगळे असल्याने व्यापारी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. ग्राहकांचीच मानसिकता बदलली नसल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत व्यापार्‍यांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना द्याव्या लागणार्‍या काही ठरावीक वस्तू या प्लास्टिकमध्ये बांधून दिल्याशिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे प्लास्टिक वापरामुळे पालिकेकडून मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे नेमके काय करायचे, या विवंचनेत व्यापारी आहेत.

एकीकडे ग्राहकांमध्ये मानसिकता बदल होणे अपेक्षित असताना केवळ दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी जाताना कापडी पिशवी नेणे आवश्यक आहे.प्लास्टिक बंदीबाबत कडक निर्बंध लादले गेल्याने ग्राहकांनी घरातूनच कापडी पिशव्या घेऊन बाजारात वस्तूंची मागणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष दुकानामध्ये वस्तूची मागणी करायला गेल्यानंतर दुकानदारांनाही तोटा होत असून, ग्राहकांनीच आता सजगता ठेवणे महत्त्वाचे आहे. बाजारात येताना आवश्यक असणार्‍या गोष्टींसाठी घरातूनच पर्यायी व्यवस्था आणणे आवश्यक आहे. अद्याप ग्राहकांचीच ही मानसिकता झाली नसल्याने ग्राहक प्रत्यक्ष दुकानात आल्यानंतर त्यांनी केलेल्या वस्तूंची मागणी नेमकी कशातून द्यायची, असा प्रश्नच दुकानदारांसमोर पडत आहे.

कारखान्यांवर हवा कारवाईचा बडगा
शहरातील काही हॉटेल व्यवसायिकांनी भजी पार्सल कापडी पिशव्यातून देण्यास सुरुवात केली आहे. तशी पर्याय व्यवस्था अन्य दुकानदारांनी ही केली पाहिजे. काही मेडिकल दुकानांमधून कागदी पाकिटामधून औषध पार्सल दिली जात आहेत. हाही पर्याय सर्वांनी स्वीकारला पाहिजे. सिंगल युज प्लास्टिकची निर्मिती करणार्‍या कारखान्यांवर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उचलला पाहिजे. उत्पादन बंद झाले तरच या सिंगल युज प्लास्टिकची विक्री बंद होणार आहे. त्यामुळे याकडेच लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Back to top button