चिकोडी : दरवर्षी महापुराची भीती, नदीकाठची अधोगती | पुढारी

चिकोडी : दरवर्षी महापुराची भीती, नदीकाठची अधोगती

चिकोडी; काशिनाथ सुळकुडे :  सलग तीन, चार वर्षांपासून पावसाळ्यात कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांना महापूर येतो. या काळात पूरस्थितीचा फटका चिकोडी उपविभागातील 88 गावांना बसत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील चिकोडी उपविभागातील चिकोडी, अथणी, रायबाग, निपाणी, कागवाड तालुक्यातून कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्या वाहतात. या सर्व नद्यांचा उगम महाराष्ट्रातून झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणार्‍या पावसावर या सर्व तालुक्यांची जलसिंचनाची उपलब्धता अवलंबून असते.

गेल्या चार, पाच वर्षांपासून अतिवृष्टीमुळे कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्या भरून वाहत आहेत. पण अतिवृष्टी व धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्याचे अयोग्य व्यवस्थापन व कर्नाटक- महाराष्ट्र राज्यातील संयुक्त नियोजनअभावी चकोडी उपविभागात पूरस्थिती निर्माण होत आहे. यामुळे चिकोडी उपविभागातील नागरिक अक्षरशः महापुराने त्रस्त झाले आहेत. 2019 साली आलेल्या महापुरात चिकोडी विभागातील येडूर, कल्लोळ, मांजरी, चंदूर, इंगळीसह अनेक गावे महिनाभर पाण्याखाली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात घरे पडली, पिकांचे, व्यवसायाचे नुकसान झाले. नागरिकांना व जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासन केले. महिनाभर ही गावे पाण्याखाली असल्याने इतर गावांशी संपर्क तुटला होता.

2019 नंतर 2020, 2021 मध्येदेखील पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नदीकाठ परिसरातील नागरिकांचे जीवन अंधकारमय बनले आहे. यंदाही नद्यांच्या पाण्याच्या पातळी वाढ होऊन पात्राच्या बाहेर वाहत आहेत. त्यामुळे पुन्हा या भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

महापुराची कारणे
धरणाचा साठा : महाराष्ट्रातील कोयना, पाटगाव व राधानगरी, काळम्मावाडी तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरण आहे. पावसाळ्यात वरील सर्व धरणे ओव्हरफ्लो होईपर्यंत पाणी अडविले जाते. जसजसा पावसाचा जोर वाढतो तसा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतो. धरणातून सोडण्यात आलेले पाणी व नद्यांना मिळणारे पावसाचे पाणी यामुळे नद्यांना महापूर येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
नदीकाठावरील अतिक्रमण : शंभर, दीडशे वर्षापूर्वीदेखील सध्यापेक्षा अधिक पाऊस होत होता. पण त्याकाळी धरण किंवा नदी काठी घरे, कारखाने नव्हते. उलट नदी काठ परिसरात झाडांच्या बागा पाहावयास मिळत होत्या. पण आज झाडे दिसत नाहीत. शहरानजीक नदीकाठावर इमारती उभारण्यात आल्या आहेत. नद्यांवर थेट अतिक्रमण झाल्याने तुडुंब वाहणार्‍या नद्यांचे पाणी पुढे जाण्यास अडचण निर्माण होत आहे. अरुंद नदी पात्रामुळे नदीपात्राच्या बाहेर पाणी पडून नजीकच्या वस्ती, गावामध्ये पाणी शिरत आहे. यामुळे नदी काठावरील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. तसेच नदी काठावरील छोटे बंधारे काढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने संयुक्तरित्या धरणाच्या पाण्याचा विसर्ग व पाणी साठयाचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

चिकोडी उपविभागातील 88 गावांना पुराचा फटका

वेदगंगा नदीच्या पुराचा फटका बसणारी गावे
चिकोडी – इंगळी, मांजरी, अंकली, चंदूर, येडूर कल्लोळ.
रायबाग – जुने डीगेवाडी, गुंडवाड, शिरगूर, खेमलापूर, सिद्धापूर, बुवाची सौंदती, मायाक्का चिंचली, भिरडी, जलालपूर, नसलापूर, कुडची, परमानंदवाडी, हारुगेरी, बेक्केरी, यबरट्टी, सुटट्टी.
अथणी- शिन्याळ, तंगडी, हुलगबाळी, हल्याळ, आवरखोड, तीर्थ, नदी-इंगळगाव, सप्तसागर, दरूर, खवटकोप्प, शेगुणशी, नागनूर, पी. के. दोडवाड, सत्ती, महिषवाडगी, नंदेश्वर, जनवाड, शिरहट्टी, बळवाड, झुंजुरवाड, सवदी, मुरगुंडी, वडरट्टी,
कागवाड – जुगुळ, शहापूर, मंगावती, उगार बी. के., उगार के. एच., ऐनापूर, कृष्णा कित्तुर, कात्राळ, बनजवाड, मोळे, शिरगुप्पी, कागवाड, कूसनाळ, मोळवाड.
वेदगंगा नदीच्या पुराचा फटका बसणारी गावे
निपाणी – सिदनाळ, जत्राट, यमगर्णी, सौंदलगा, भिवशी, हून्नरगी, आडी, नागनूर, अकोळ, ममदापूर, गळतगा, कोडणी, बुदीहाळ.
दूधगंगा नदीच्या पुराचा फटका बसणारी
चिकोडी- एकसंबा, मलिकवाड, सदलगा, शमनेवाडी, जनवाड.
निपाणी- कोगनोळी, कुन्नूर, मांगुर, बारवाड, भोज, कारदगा, बेडकिहाळ, शिरदवाड, माणकापूर.

Back to top button