चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत १ फुटांनी वाढ; पावसाने ११७ घरांची पडझड | पुढारी

चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत १ फुटांनी वाढ; पावसाने ११७ घरांची पडझड

चिकोडी; काशिनाथ सुळकुडे : महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, कोकण व कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत 1 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी काठावरील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर मागील आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसाने चिकोडी उपविभागात 117 घरांची पडझड झाली आहे.

मागील आठवडाभरापासून महाराष्ट्र राज्यसह चिकोडी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. पण आज, रविवारी तालुक्यात दुपारनंतर पावसाने उसंत घेतली आहे. तरी देखील कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू असून कृष्णा, दुधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील 4 पूल वजा बंधारे अद्यापही पाण्याखाली असून वाहतूक ठप्प आहे.  तालुक्यातील 6 पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले असून यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

चिकोडी तालुक्यातील 4 बंधारे पाण्याखाली

कृष्णा नदीवरील कल्लोळ – येडुर बंधारा, मांजरी- बुवाची सौन्दत व दुधगंगा नदीवरील मलीकवाड – दत्तवाड अशी 4 बंधारे वजा पूल पाण्यखाली आहेत. सदर मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तालुक्यातील वाहणाऱ्या दुधगंगा नदीची पाणी पातळी सदलगा येथे 533.510 मीटर तर 18 हजार 10 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कृष्णा नदीला शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून 57 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग तालुक्यात येत आहे. तालुक्यातील कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधाऱ्यातून 75 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अथणी तालुक्यातील हिप्परगी बंधाऱ्यातून 72 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पाणी पातळी 520.5 मीटर तर पाण्याचा साठा 2.42 टीएमसी इतका आहे. अलमट्टी जलाशयात 75149 क्युसेक्स इतके बॅकवॉटर उपलब्ध आहे.

चिकोडी तालुक्यातील प्रमुख बंधारे व पुलाची पाणी पातळी 

  • अंकली – मांजरी (कृष्णा नदी) : धोकादायक पातळी – 537 मी
    सद्या असलेली पातळी – 528.86 मी
  • सदलगा ( दूधगंगा + वेदगंगा नदी ) धोकादायक पातळी – 538 मी                                                                                      सद्या असलेली पातळी – 533.51
  • हिप्परगी बंधारा – कृष्णा नदी धोकादायक पातळी – 524.87
    सद्या असलेली पातळी – 520.50 मी

चिकोडी तालुक्यातील पावसाचे प्रमाण :

चिकोडी : 13.2 मी मी, अंकली 8.6 मी मी , नागरमुणोळी 9.6 मी मी, सदलगा 12.8 मी मी, जोडट्टी 8.28 मी मी. इतक्या पावसाची नोंद 24 तासात झाली आहे.

चिकोडी उपविभागात 117 घरांची पडझड

मागील आठवडाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी उपविभागात 117 घरांची पडझड झाली असून यात 10 घरे संपूर्णपणे जमीनदोस्त तर 107 घरांची भागश: पडझड झाली आहे. यात चिकोडी तालुक्यात 82 व कागवाड तालुक्यात 24 घरांचे भागश : पडझड झाली आहे. अथणी तालुक्यात 10 घरांचे नुकसान झाले आहे.

पावसाचा जोर वाढल्यास पुराची शक्यता

महाराष्ट्र राज्यातील पाठगाव धरण परिसरात 90 मिमी इतका पाऊस काल झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत धीम्या गतीने वाढ होत आहे. पाठगाव, कोयना, राधानगरी या धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यास तालुक्यात पूरस्थिती येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांनी दिली.

Back to top button