नोकरीवरून काढल्याचा रागातून वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या, दोघा अनुयायांना अटक | पुढारी

नोकरीवरून काढल्याचा रागातून वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या, दोघा अनुयायांना अटक

हुबळी : पुढारी वृत्तसेवा :  प्रख्यात ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ व सरळ वास्तूचे संचालक चंद्रशेखर गुरुज  (वय 58, रा. हुबळी) यांची निर्घृण हत्या झाली. त्यांच्या दोघा अनुयायांनीच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले. सर्वत्र नाकाबंदी करून हत्येनंतर अवघ्या दोन तासांत आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली. महांतेश शिरूर (27) व मंजुनाथ मरेवाडा (25, दोघेही रा. दुमूवाडा, जि. धारवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कामावरून काढून टाकल्याचा राग व मालमत्तेच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांनी चाकूने तब्बल 40 वार केल्याचे स्पष्ट झाले असून उपचारापूर्वीच गुरुजींचा मृत्यू झाला. हुबळी येथील उनकल परिसरातील एका हॉटेलमध्ये चंद्रशेखर गुरुजी वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारी दोघे तरुण त्यांना भेटण्यासाठी आले. रिसेप्शनिस्टला सांगून त्यांनी गुरुजींना बोलावून घेतले. सुरुवातीला दोघांपैकी एकट्याने त्यांच्या पायावर डोके ठेवून आशिर्वाद घेण्याचे नाटक केले. यावेळी गुरुजी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असताना थांबलेल्या तरुणाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी खाली वाकलेल्या तरुणानेही चाकूने भोसकण्यास प्रारंभ केला. दोघांनी मिळून गुरुजींचे पोट, छाती, गळा यासह शरीराच्या प्रत्येक भागावर चाकूने सापासप वार केले. यामध्ये गुरुजी रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने किम्स रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

ही घटना 12.23 वाजता घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. हॉटेलचा कर्मचारी वर्ग पुढे येताच त्यांना चाकूची भीती दाखवत दोघांनी येथून पळ काढला. त्यांनी केलेल्या हल्ल्याचे तसेच पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.
हल्लेखोरांचा चेहरा स्पष्ट झाल्याने ते कोण आहेत? याची खात्री पोलिसांना पटली. त्यामुळे त्यांनी तातडीने संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पाऊले उचलली.

आरोपींना रामदुर्गमध्ये पकडले ही घटना हुबळीतील विद्यानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यांना तातडीने याची माहिती दिल्यानंतर हुबळी, धारवाडसह बेळगाव जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. सदर आरोपी सौंदत्तीहून मोरबमार्गे रामदुर्गला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रामदुर्गचे उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रामदुर्ग येथील कॉलेजजवळ सापळा रचण्यात आला. संशयित दोघेजण कारमधून निघाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी दोन जेसीबी व काही ट्रॅक्टर लावून रस्ता अडवला. येथे संशयित येताच त्यांना गाडीतून उतरवून ताब्यात घेतले. यानंतर त्यांना हुबळी पोलिसांच्या हवाली केले.

नोकरीवरून काढल्याचा राग

मंजुनाथ व महांतेश हे दोघेजण चंद्रशेखर गुरुजींकडे कामाला होते. शिवाय येथे 16 वर्षापासून काम करणार्‍या वनजाक्षी या तरुणीचा विवाह गुरुजींनी पुढाकार घेऊन मंजुनाथशी लावून दिला होता. मंजुनाथही येथे गेल्या 12 वर्षापासून कामावर होता. या दाम्पत्याला गुरुजींनी राहण्यासाठी फ्लॅटही दिला होता. शिवाय काही मालमत्ता देखील गुरुजींनी मंजुनाथच्या नावे केली होती. ती परत देण्यासाठी गुरुजींनी तगादा लावला होता. याच कारणातून गुरुजींचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करणे सुरू होते. याप्रकरणी वनजाक्षी या तरुणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. परंतु पोलिसांनी याला अद्याप दुजारा दिलेला नाही. घटनेनंतर हुबळीचे पोलिस आयुक्त लाबुराम, एसीपी विनोद मुक्तेदार यांनी घटनास्थळी भेट दिली. तातडीने सूत्र हलवत त्यांनी नाकाबंदीचे आदेश दिल्याने दोघा संशयितांना अवघ्या दोन तासात जेरबंद करणे शक्य झाले. विद्यानगर पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक व्ही. एस. चौगुले तपास करीत आहेत.

प्रख्यात ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी

सरळवास्तूचे प्रख्यात ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी हे प्रख्यात वास्तूतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वास्तूशास्त्र मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये त्यांची ख्याती आहे. कर्नाटकसह महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश येथून लोक त्यांच्याकडे वास्तूशास्त्राची माहिती घेण्यासाठी येतात. त्यांनी वास्तूशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली असून टी.व्ही. वरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

Back to top button