चला जाऊ शाळेला, स्कूल बस येणार न्यायला; पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारची योजना | पुढारी

चला जाऊ शाळेला, स्कूल बस येणार न्यायला; पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारची योजना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सरकारी शाळांतील मुलांची पटसंख्या वाढावी म्हणून सरकारी शाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्कूल बस योजना राबवण्यात येणार आहे. या बसचा चालक व बस दुरुस्तीचा खर्च शाळा सुधारणा समितीने करायचा आहे. त्यामुळे स्कूल बस योजनेला कसा प्रतिसाद मिळणार आहे, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठी अनुकूल व्हावे, या उद्देशाने शालेय स्कूल बस सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार फंडातून वाहन खरेदी करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. कार्यक्रम संयोजन आणि सांख्यिकी खात्याचे उपसचिव डी. चंद्रशेखरय्या यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या या निर्णयामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

वाहनचालकाचे वेतन, इंधन आणि दुरुस्तीचा खर्च शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समितीने इतर अनुदानातून करावा, अशी अट आहे. सरकारी शाळांमधील मुलांना खासगी शाळांप्रमाणे सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात शालेय वाहन व्यवस्थेची तरतूद केली होती. ग्रामीण भागात खासगी शाळांची संख्या वाढत असून सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. शिवाय मुलांना शाळेला जाण्यासाठी सरकारी बस किंवा इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Back to top button