बेळगाव : टेट्रा पॅकने पोहोचवले खुन्यापर्यंत; संशयितांना राधानगरी तालुक्यातून जेरबंद | पुढारी

बेळगाव : टेट्रा पॅकने पोहोचवले खुन्यापर्यंत; संशयितांना राधानगरी तालुक्यातून जेरबंद

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : खून झालेल्या तरुणाला हल्लेखोरांनी रात्री साडेबारा वाजता भेटायला बोलावले अन् खून केला. त्यामुळे आजूबाजूला कोणी प्रत्यक्ष साक्षीदारांना सीसीटीव्ही. त्यामुळे खुन्यांना पकडण्याचे आव्हान होते. घटनास्थळी व्हिस्कीचे रिकामे टेट्रापॅक सापडले अन् खुन्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

यल्लेशप्पा कोलकार या तरुणाचा अत्यंत निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर हा बदला असल्याचे तेव्हाच पोलिसांना समजले. परंतु, त्याचे काहीच पुरावे मिळत नव्हते. परंतु, घटनास्थळी पोलिसांना व्हिस्कीचे रिकामे टेट्रापॅक मिळाले, शिवाय बाजूलाच रिकामी काडेपेटीदेखील सापडली. परंतु, खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतके पुरावे अपुरे होते. तेव्हा मृताच्या मोबाईलवर कॉल डिटेल्स्देखील काढून घेतले. त्यावर आलेले कॉल्स्, टेट्रापॅक नेमके कोठून खरेदी केले होते तेथील सीसीटीव्ही फुटेज, ज्या गल्लीतून रात्री दोन तरुण बाहेर पडले त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, असे बरेच काही जमा करून पोलिसांनी गतीने तपास सुरू केला. त्यामुळे अवघ्या 24 तासांत खुनी सापडले.

खुनी लपले महाराष्ट्रात

खुनानंतर रात्रीच पाचही संशयित महाराष्ट्रात जाऊन लपले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव येथे ते गेले होते. महाराष्ट्रातील पोलिसांशी संपर्क, येथून तातडीने गेलेली टीम यामुळे आदमापूरपासून काही अंतरावर असलेल्या कोलव येथे सापडले. या ठिकाणी सर्व वाहने एमएच पासिंगची असताना एक रिक्षा मात्र रस्त्यावर केए पासिंगची दिसत होती. त्यावरूनही पोलिसांचा संशय बळावला अन् तपास केला असता पाचही संशयित तेथेच सापडले.

निरीक्षक धीरज शिंदेंची तत्परता

उद्यमबागचे पोलिस निरीक्षक धीरज शिंदे हे एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. खुनाची मोडस ऑपरंडी पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी चारीही दिशांनी तपास सुरू केला. ज्या काही शक्याशक्यता आहेत त्या सर्व पडताळून पाहिल्या अन् खुन्यांना त्याच शिताफीने अटक केली. त्यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Back to top button