बेळगाव : संपला जून तरी अजूनही ऊन; शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार | पुढारी

बेळगाव : संपला जून तरी अजूनही ऊन; शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपला तरी, अजून दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांसह शहरवासीय पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राकसकोप जलाशयातील पाणी पातळीने तळ गाठला असून लवकरच मृत साठ्यातील पाणीसाठा बेळगावकरांना पुरवावा लागणार आहे. राकसकोप जलाशयामध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. त्यामुळे भविष्यात बेळगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची माहिती एलअँड टी कंपनीने आठवडाभरापूर्वी दिली आहे. त्यामुळे पावसाळा असला तरी, पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

शहरात पाणीटंचाईची शक्यता पाणीसमस्या निवारणासाठी औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठा कपातीचा विचार एलअँडटी कंपनी करत आहे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपत आला आहे. पावसाने दडी मारल्याने शहरात पाणीसमस्या निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मृत साठ्यातील (डेड स्टोअरेज) पाणीउपसा करावा लागण्याची शक्यता असल्याने एलअ‍ॅण्डटी कंपनीची चिंता वाढली आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचाही विचार असल्याची माहिती एलअ‍ॅण्डटीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी दिली.

महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आणि एलअ‍ॅण्डटी तसेच पायाभूत सुविधा मंडळाच्या अधिकार्‍यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठ्यासंदर्भात चर्चा करून पाणीटंचाई समस्या निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सध्या शहरवासियांना वापरण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकांचा पाणीपुरवठा केला जातो. ज्या ठिकाणी पाणीसमस्या निर्माण होईल, त्या भागात विहिरीतील पाणी टँकरने पुरवठा करण्याच्यादृष्टीने 10 टँकरची व्यवस्था केली आहे. सध्या महाराष्ट्र व विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

..तर 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा

शहरवासियांना 3 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र राकसकोप जलाशयातील पाणीपातळी कमी झाल्याने पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. सध्या 5 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तरीदेखील 10 ते 12 दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. आणखी 8 दिवस पाणीपुरवठा करता येणे शक्य आहे. मात्र डेड स्टोअरेजमधील पाणीसाठा जास्त दिवस पुरणार नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे.

Back to top button