बंगळूर : पंचायत निवडणुका लांबणीवर पडणार | पुढारी

बंगळूर : पंचायत निवडणुका लांबणीवर पडणार

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने पंचायतराज पुनर्रचना आयोगाची मुदत सहा महिने वाढवली आहे. या आयोगाकडून जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना जुलैअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका घेण्यात येणार आहेत.

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने बंगळूर महापालिकेचे माजी आयुक्त एम. लक्ष्मीनारायण यांच्या नेतृत्वाखाली पंचायतराज पुनर्रचना आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाची मुदत सहा महिने होते. पण, जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. गेल्या एप्रिलमध्ये आयोगाची मुदत संपली. पनर्रचना करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी 18 जून रोजी ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याने आदेश जारी केला. त्यानुसार आयोगाची मुदत आणखी सहा महिने वाढवण्यात आली. ऑक्टोबरपर्यंत आयोगाला वेळ मिळाला असून त्याआधी पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांना विलंब होत असल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला फटकारले होते. पुनर्रचना व इतर प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन निवडणुका घेण्याची ताकीद दिली होती. पण, सरकारने स्थापन केलेल्या आयोगाकडून जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचनेचे काम केवळ 70 टक्के पूर्ण झाले आहे. आणखी 30 टक्के काम पूर्ण करण्यासाठी महिनाभर लागणार आहे. पुनर्रचनेवर आक्षेप मागवून पुढील कार्यवाहीसाठी काही दिवस लागतील. त्यानंतर निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार सरकारकडून सध्यातरी वेळकाढूपणा केला जात आहे. काही झाले तरी पुनर्रचना पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारकडून वेळ मागून घेण्यात येत आहे.

ऑगस्टमध्ये होईल प्रक्रिया पूर्ण

कर्नाटक निवडणूक आयोगाचे आयुक्त बी. बसवराजू यांनी बंगळूर महापालिकेबरोबरच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका घेण्याची तयारी असल्याचे सांगितले. आयोगाने प्राथमिक तयारी केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरकारला पुनर्रचना प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुका घेण्यात येतील.

Back to top button