बेळगावला हादरवणार्‍या हत्याकांडातील आरोपी निर्दोष | पुढारी

बेळगावला हादरवणार्‍या हत्याकांडातील आरोपी निर्दोष

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा बेळगावसह संपूर्ण राज्य हादरवून सोडलेल्या कुवेंपूनगर येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट निर्दोष असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिला आहे. प्रत्यक्ष साक्षीदार नसणेे आणि सबळ पुराव्यांचा अभाव यामुळे त्याची निर्दोष मुक्‍तता झाली. याविरुद्ध सरकारी पक्ष दाद मागणार का, हे अद्याप ठरलेले नाही. बेळगाव जिल्हा न्यायालयाने प्रवीणला 16 एप्रिल 2018 रोजी या तिहेरी खून प्रकरणात जन्मठेप ठोठावली होती. या शिक्षेविरोधात प्रवीणने उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाद मागितली होती. न्यायमूर्ती के. एस. मुदगल, एम. जी. एस. कमल यांच्या पीठाने प्रवीणला निर्दोष ठरवले.

16 ऑगस्ट 2015 रोजी पहाटे कुवेंपूनगरातील घरात रीना मालगत्ती, तिचा मुलगा आदित्य (वय 12)आणि मुलगी साहित्या (वय 5) यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यामुळे बेळगावसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी 24 तासांत प्रवीण भटला अटक केली होती. प्रवीण आणि रीना मालगत्ती यांच्यातील अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते.

कॉलेजमध्ये शिकत असलेल्या प्रवीण भटने रीना आणि तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले होते.
मूळचा कारवार जिल्ह्यातील असलेल्या पालकांसमवेत प्रवीण बेळगावच्या कुवेंपू नगरात अनेक वर्षांपासून राहात होता. खुनाच्या एक वर्ष आधी प्रवीण आणि रिना यांचे स्नेहसंबंध जुळून आले होते. रिनाच्या पतीच्या अनुपस्थितीत शेजार्‍यांना संशय येऊ नये म्हणून प्रवीण रिनाच्या घरी समोरच्या दरवाजाने न जाता टेरेसवरून जात असे. खून झालेल्या दिवशीही तो रात्री दोन वेळा रिनाला भेटल्याचे सिद्ध झाले होते.

16 ऑगस्ट 2015 रोजी दोघांमध्ये भांडण होऊन प्रवीणने रिनाचा गळा चिरून खून केला. त्यावेळी मुले जागी झाल्याने मुलांनाही पाण्याच्या बादलीत डोके बुडवून ठार केले, असा आरोप एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर ठेवला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने 16 एप्रिल 2018 रोजी प्रवीणला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात प्रवीणने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने सुनावणी करून प्रवीण निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. त्यानंतर प्रवीणला हिंडलगा कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे.

Back to top button