कर्नाटक : आयुक्त रजेवर, मोकाट कुत्र्यांची नसबंदी वार्‍यावर! | पुढारी

कर्नाटक : आयुक्त रजेवर, मोकाट कुत्र्यांची नसबंदी वार्‍यावर!

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी ठेकेदार निश्‍चित झाला आहे. पण, करारपत्रावर सह्या रखडल्या असून महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी रजेवर असल्यामुळे नसबंदी मोहीम लांबणीवर पडत आहे. महापालिकेने काढलेल्या निविदेनुसार बंगळूर येथील अ‍ॅनिमल केअर कंपनीने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका मिळवला आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी 1590 रूपये त्यांना मिळणार आहेत.

ठेकेदार निश्‍चित होवून महिना होत आला तरी, प्रत्यक्ष काम मात्र रेंगाळत आहे. याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता करारपत्रावर ठेकेदार आणि महापालिका आयुक्तांची सही होणे बाकी आहे. ठेकेदाराने करारपत्रावर सह्या केल्या आहेत. पण, आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी गेल्या तीन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे करारपत्रावर सह्या झालेल्या नाहीत.

महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जुलैपासून मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्याआधी ठेकेदाराने श्रीनगर येथील कार्यशाळेत सुचवलेल्या दुरूस्ती करण्यात येणार आहे. पण, ठेकेदार तयार असताना आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असताना 1 जुलैचा मुहुर्त कशासाठी शोधण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित होत
आहे. मोकाट कुत्र्यांची नसबंदी करून लोकांना होणार्‍या त्रासापासून वाचवावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button