बेळगाव तालुकाही अतिवृष्टीग्रस्त | पुढारी

बेळगाव तालुकाही अतिवृष्टीग्रस्त

बंगळूर, बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव तालुकाही अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याने आता संपूर्ण जिल्ह्याचा समावेश ‘अतिवृष्टीग्रस्त’ यादीत झाला आहे. चार दिवसांपूर्वी प्रशासनाने बेळगाव तालुका वगळून जिल्ह्यातील इतर 13 तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याचे जाहीर केले होते. मंगळवारी हा निर्णय बदलला.

बेळगावबरोबरच दांडेली (जि. कारवार), मुडिगेरे (जि. चामराजनगर) सह आणखी 22 तालुके अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. याआधी राज्यातील 13 जिल्ह्यांमधील 61 तालुके पूर, अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. यामध्ये आता आणखी 22 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे एकूण 83 तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

भाजप आमदार एम. पी. कुमारस्वामी यांनी आपल्या चामराजनगरत जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश यादीत न झाल्याने धरणे धरले होते. त्यांनी महसूल मंत्री आर. अशोक यांची भेट घेऊन मागणीही केली होती. त्यांना याबाबतचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्या आश्‍वासनांची पूर्तता मंगळवारी करण्यात आली. तालुक्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकार्‍यांकडे मागणी केली होती.

बेळगाव तालुक्याचा समावेश अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीत करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक माहिती दिली होती. बंगळूरमध्येही संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्या प्रयत्नांना यश आले.
-लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार

Back to top button