बेळगाव : सुशिक्षितांची साडेअकरा हजार मते बाद | पुढारी

बेळगाव : सुशिक्षितांची साडेअकरा हजार मते बाद

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा शिक्षकांना, सुशिक्षतांना विधिमंडळात प्रतिनिधीत्व मिळावे या उद्देशाने शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निर्मिती करण्यात आली. असे असतानाही बुधवारी झालेल्या वायव्य पदवीधर, शिक्षक आणि पश्‍चिम शिक्षक मतदारसंघात पसंतीक्रम मतदान प्रक्रियेत तब्बल साडेअकरा हजार मते बाद झाली आहेत. एकूण 1 लाख 2 हजार 900 झालेल्या मतांपैकी सुशिक्षितांची 11 हजार 499 मते अवैध ठरली आहेत.

वायव्य पदवीधर मतदार संघात एकूण 99 हजार 598 मतदार संख्या होती. यापैकी 65 हजार 922 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. यापैकी पदवीधरांनी केलेल्या मतदानापैकी तब्बल 9 हजार 6 मते अवैध ठरली आहेत. त्याचबरोबर वायव्य शिक्षक मतदारसंघामध्ये 25 हजार 386 पैकी 21 हजार 401 मतदारांंनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला होता. या मतदानामध्ये 1 हजार 270 मते अवैध ठरली. पश्‍चिम शिक्षक मतदार संघामध्ये एकूण 17 हजार 973 पैकी 15 हजार 577 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला होता. यापैकी 1 हजार 223 मते अवैध ठरली.

केवळ शिक्षक मतदार संघात 2 हजार 493 मते अवैध ठरली. त्याचबरोबर पदवीधरमध्ये 9 हजार 6 मते अवैध ठरली. शिक्षकानी केलेल्या चुकाच पदवीधर मतदारांनी केल्याचे दिसून आले. पसंतीक्रमाने मते देताना देवनागरी, इंग्रजी किंवा कन्नड भाषेत क्रमांक लिहायचा होता. अक्षरी क्रमांक लिहिण्यास बंदी घालण्यात आली होती. अनेकांनी मतपत्रिकेवर अक्षरी क्रमांक लिहिला होता. काही जणांनी मतपत्रिकेवर बरोबर अशी खूण केली होती. सुशिक्षित मतदारांनी अनावश्यक सह्या केल्या होत्या. स्वत:चा पेन मतदान करताना वापरु नका, असे सांगितले असतानाही स्वत:चा पेन वापरला. मतदान करताना प्राधान्य क्रम 1 मत देणे सक्‍तीचे असतानाही अनेकांनी क्रमांक दोनपासून सुरुवात केली. ही सर्व मते अवैध ठरली.याबाबत प्रशासानतर्फे जनजागृती राबवण्यात आली होती. तरही मतदानाच्या जवळपास अकरा ते बारा टक्के मत अवैध ठरली आहेत.

शिक्षकांची इतक्या मोठ्याप्रमाणात मते बाद होणे ही चिंतनीय बाब आहे. याबाबत जनजागृती मोहीम प्रशासन आणि पक्षाकडूनही राबवण्यात आली होती. यापुढे मतदानपूर्व प्रात्यक्षिके अधिक प्रमाणात राबवण्याची गरज आहे.
– बसवराज होरट्टी सभापती, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघातून विजयी उमेदवार

Back to top button