कर्नाटक : विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू; मुख्यमंत्री बोम्मई | पुढारी

कर्नाटक : विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू; मुख्यमंत्री बोम्मई

बेळगाव (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा
राज्यसभा निवडणुकीत आम्ही तीन जागा जिंकल्या आहेत. आता विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू, असा विश्‍वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला. डॉ. प्रभाकर कोरे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा विषयच नाही, असेही त्यांनी सांगितले.

शनिवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी येथील खासगी हॉटेलमध्ये पक्षाचे खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यसभेत आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या चार जागा जिंकण्याचा विश्‍वास आहे. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येडियुरप्पा यांच्यासोबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र प्रचार केला आहे. अरुण शहापूर, हनुमंत निराणी निवडून येतील.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत डॉक्टरेट देण्याचा कार्यक्रम सहा महिन्यांपूर्वीच ठरल्याचे त्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे ते प्रचारात नव्हते. कुठे सूचना द्यायच्या आहेत तेथे डॉ. कोरे यांनी त्या दिल्या आहेत. बेळगाव आणि हुबळीत मोठी सभा घेणार आहोत. डॉ. कोरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. कोरे यांनी 40 वर्षे अखंड सामाजिक जीवनात केलेले कार्य आम्हाला मार्गदर्शक आहे. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नका. आमच्यात 100 टक्के एकी आहे. जिल्ह्यातील सर्व सावकारांनी निवडणुकीत रस घेऊन काम केले आहे.

सिद्धरामय्या माझ्या विरोधातही बोलतात. बेळगावात माझ्याविषयी त्यांनी कोणती भाषा वापरली तुम्हाला माहीत आहे. सिद्धरामय्या असोत किंवा कुमारस्वामी, त्यांच्या वक्तव्यावर आपण बोलायचे नाही असे मी ठरवले आहे, असेही बोम्मई यांनी सांगितले. एका पक्षाला संपवायचे हे दुसर्‍या पक्षाच्या हाती नसते.

सत्ता कुणी मिळवायची कुणी गमवायची, हे जनतेच्या हातात आहे असे बोम्मई म्हणाले. पत्रकारांशी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे व इतर नेतेही उपस्थित होते. तर बैठकीला पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, आमदार लक्ष्मण सवदी, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, पी. राजीव, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, उमेदवार अरूण शहापूर, हनुमंत निराणी यांच्यासह इतर उपस्थित होते.

सर्वांनी प्रामाणिक काम करा

खासगी हॉटेलमध्ये खासदार आणि आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सर्वांनी प्रामाणिक काम करावे, अशा सूचना केल्या.

Back to top button