बेळगुंदी : 16 मे रोजी भात पेरणीची परंपरा इतिहासजमा | पुढारी

बेळगुंदी : 16 मे रोजी भात पेरणीची परंपरा इतिहासजमा

बेळगुंदी : प्रल्हाद चिरमुरकर : बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बेळगुंदीमध्ये सर्वप्रथम 16 मे रोजी भात पेरणी करण्यात येत होती. मात्र, सध्या सगळीकडेच रोप लावण्याचा प्रकार सुरू झाल्याने ती परंपरा इतिहासजमा झाली आहे.

भात पेरणीसाठी वर्षभर मशागत करण्यात येत होती. अपुर्‍या यंत्रामुळे बैल जोड्या (औत) वापरून नांगरणी, कुळवणी, ढेकळे फोडणे आदी मशागतही पावसाळ्यापूर्वी करण्यात येत होती. पेरणीसाठी उपयुक्त शेती आधीच तयार करून ठेवण्यात येत होती. आणि निसर्गाची वाट पाहात शेतकरी आकाशाकडे डोळे लावून राहत होते.

मात्र, बेळगुंदीमध्ये पाऊस उशिरा अथवा लवकर आला तरी 16 मे रोजी मल्लाप्पा कुरबर हे शेतकरी प्रतिवर्षी आपल्या शेतीमध्ये भात पेरणी करायचे. गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा सुरू होती. तीच परंपरा त्यांचे पुत्र बाळू कुरबर यांनीदेखील सुरू ठेवली होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भात रोप लागवड (नटी) लावण्याचा प्रकार चालू झाल्याने पेरणीची ती परंपरा इतिहासजमा झाली आहे.

साधारण 10 वर्षांपासून बेळगुंदी भागातही रोप लावण्याची पद्धत रूढ झाली. त्याआधी सारी पेरणी धूळवाफ पद्धतीने कुरीने होत होती. कुरीने पेरणी करण्याच्या या पद्धतीचा वापर करून कुरबर कुटुंब 16 मे रोजी आपल्या एका शेतातील पेरणी करायचे. मात्र, आता रोप लागवडीमुळे त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून ही पद्धत बंद केली आहे.

रोप लागवडीचे फायदे

रोप लावण्याच्या प्रकारांमध्ये अंतर मशागत करणे सोपे असते तसेच तण काढणे, हुट ओढणे पेसाटी मारणे हे प्रकारही करावे लागत नाहीत. थेट यंत्राच्या साह्याने अथवा बैलजोडीच्या सहाय्याने चिखल करून रोप लावले जातात. अशा पद्धतीने केलेल्या लागवडीसाठी मनुष्यबळ कमी लागते. शिवाय शेतात तणही वाढत नाही. रोप लागवडीसाठी मजुरांचा वापर केला जातो. मात्र, लागवडीनंतर भात कापणीपर्यंत मजुरांची गरज भासत नाही अलीकडे तर भात कापणी आणि मळणीदेखील यंत्राच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

आमचे वडील मल्लाप्पा कुरबर हे 40 वर्षांपासून 16 मे रोजी भात पेरणी करत होते. तीच परंपरा आम्हीदेखील चालू ठेवली होती. मात्र, अलीकडे भात रोप लागवडीचा प्रकार आल्याने त्यामध्ये मजुरांचा वापर कमी आणि उत्पन्नातदेखील दुपटीने वाढ झाल्याने आम्ही ती परंपरा बंद करून सगळीकडेच भात रोप लागवड करत आहे.
– बाळू कुरबर, शेतकरी, बेळगुंदी

 

Back to top button