बेळगाव : आचारसंहितेचे काटेकोर पालन आवश्यक : आमलान बिस्वास | पुढारी

बेळगाव : आचारसंहितेचे काटेकोर पालन आवश्यक : आमलान बिस्वास

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या पदवीधरच्या दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागा अशा एकूण चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 13 जूनला मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिस्वास यांनी पत्रकार परिषदेत केले. कर्नाटक वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक मतदार संघासाठीचे उमेदवारी अर्ज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आदी उपस्थित होते.

बिस्वास म्हणाले, या चारही मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता गुरुवारपासून लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. परवानगीशिवाय निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा घेता येणार नाही. परवानगी न घेता अशी सभा घेतल्यास अशा उमेदवारांवरही कारवाई होणार आहे.
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी दोन स्वतंत्र मतपेट्या एकाच बूथमध्ये ठेवल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात करावे लागणार आहे. पश्चिम शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.

19 मेपासून उमेदवारी अर्जाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक मतदाराला त्यांच्या बूथची माहिती थेट जीपीएसद्वारे देण्यात येणार आहे. नामांकित व्यक्तीसह फक्त पाच लोक आणि दोन वाहनांना उमेदवारी अर्ज करण्यासाठी येण्यास परवानगी आहे.

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, कोरोना मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार करावा लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या रॅली आणि पदयात्रांना बंदी आहे. प्रचारामध्ये पाचपेक्षा जास्त वाहने वापरता येणार नाहीत. मतमोजणीचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ होणार आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रीतम नसलापुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button