बेळगाव : लाचारीने जगू नका ; शरद पवार | पुढारी

बेळगाव : लाचारीने जगू नका ; शरद पवार

अंकली : पुढारी वृत्तसेवा; जगताना लाचारी स्वीकारू नका, स्वाभिमानाने जगा असा संदेश देत वीर राणी कित्तूर चन्‍नमांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आजच्या घडीला हाच संदेश पुन्हा एकदा देण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य लढ्यात वीर राणीने महिला म्हणून संपूर्ण जगात एक आदर्श निर्माण केला. अशा कर्तृत्ववान व स्वाभिमानी महिलेच्या पुतळ्याचे अनावरण करणे हे माझे भाग्यच आहे. आतापर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक घटना घडल्या. त्यापैकी चन्‍नमाजींच्या पुतळ्याचे अनावरण ही घटना अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.

अंकली (ता. चिकोडी) येथे वीर राणी कित्तूर चन्‍नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे मद्यार्क निर्मिती घटक, इथेनॉल निर्मिती घटक भूमिपूजन समारंभ व डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकाचे सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आ. गणेश हुक्केरी, दुर्योधन ऐहोळे, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, सांगलीचे खासदार संजय पाटील, राज्य सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष कृष्णा रेड्डी, उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवणे, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष महांतेश पाटील, उपाध्यक्ष सिद्धगौडा मगदूम संचालिका डॉ. प्रीती दोडवाड, सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याध्यक्ष आर. हरी व्यासपीठावर होते.

शरद पवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाचा त्याग केला. अशातच एक वीर राणी कित्तूर चन्नमा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आज त्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. आरोग्य, शिक्षण, सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे नेतृत्व म्हणजेच प्रभाकर कोरे.

प्रभाकर कोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व त्यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वामुळेच केएलईने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. आज देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात गेले तरी त्या ठिकाणी केएलई शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी आढळतो. सहकार, शिक्षण क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रातही त्यांनी अनेक नवनवीन बदल घडवून उद्योगधंदेही उभारले. आज त्याचे प्रतीक म्हणून चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल व मद्यार्क निर्मिती घटक स्थापन करण्यात येत असल्याचे पवार म्हणाले.

शरद पवारांमुळेच संस्था नावारुपास : डॉ. प्रभाकर कोरे

आज आपण ज्या सहकारी संस्था उभ्या केल्या आहेत त्या सर्व शरद पवार यांच्या कृपाशीर्वादामुळेच. साखर उद्योगातसुद्धा त्यांच्या आशीर्वादामुळेच पाऊल ठेवले. सहकारी तत्त्वावरील एकमेव साखर कारखाना म्हणजेच आपला चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वाटचाल केल्यामुळेच केएलई शिक्षण संस्थाही आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यास त्यांचा सहभाग लाखमोलाचा आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button