बेळगाव : मुख्यमंत्रिपदासाठी 2500 कोटींचे आमिष | पुढारी

बेळगाव : मुख्यमंत्रिपदासाठी 2500 कोटींचे आमिष

बेळगाव/बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतून आलेल्या काहीजणांनी आपल्याकडे 2500 कोटींची मागणी केली आहे. ही रक्‍कम दिल्यास मुख्यमंत्रिपद देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार बसनगौडा पाटील, यत्नाळ यांनी केला आहे. निवडणूक काळात असे प्रकार होतात. पण, कुणीही आमिषाला बळी पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

रामदुर्ग (जि. बेळगाव) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक जवळ आल्यानंतर भामटे सक्रिय होतात. काही कोटींची रक्कम ते मागतात. त्या बदल्यात पक्षाच्या श्रेष्ठींची भेट घालून देण्याचे ते सांगतात. पण, यामागे कुणीही धावू नये, अशा भामट्यांपासून सावधान राहावे. मी स्वत: वाजपेयी यांच्या कार्यकाळात मंत्री म्हणून सेवा बजावली आहे.

अडवाणी, राजनाथ सिंह, अरुण जेटली आपल्याशी आपुलकीने वागत होते. अशातच आपल्याशी संपर्क साधून काहींनी 2500 कोटींची मागणी करून भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शहा यांची भेट घडवून आणण्याचे सांगत आहेत.

काँग्रेसकडून चौकशीची मागणी

दिल्लीतून आलेल्यांनी 2500 कोटी रुपये दिल्यास मुख्यमंत्रिपद देण्याचे आमिष दाखवले होते, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

यत्नाळ यांच्या विधानामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यत्नाळ ही सामान्य व्यक्ती नाही. भाजपचे ते मोठे नेते आहेत. खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कोणत्याही विधानाची गांभीर्याने दखल घेतली जाते. त्यामुळे एसीबीने या प्रकरणी चौकशी करावी, असे शिवकुमार म्हणाले.

या प्रकरणी राज्यपालांनी चौकशीचे आदेश देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांनी केली आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. केंद्रातील नेत्यांनी यत्नाळ यांच्याकडे 2500 कोटींची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकाला संपूर्ण देशात मान खाली घालावी लागली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाची एसीबीकडे तक्रार

दरम्यान, काँग्रेस शिष्टमंडळाने एसीबीला याविरुद्ध तक्रार दिली आहे. 2500 कोटींची मागणी केल्याबाबत कसून चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने एसीबीकडे केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button